PM Narendra Modi: उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. मौनी अमावस्येमुळे संगम किनाऱ्यावर रात्रीपासून कोट्यवधी भाविक जमले होते. मात्र रात्री १ वाजताच्या सुमारास गोंधळ उडाला आणि यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. तसंच १० भाविकांचा मृत्यू झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दोन वेळा फोनवरून चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमींना तत्काळ मदत करावी, अशा सूचना दिल्या.
पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही योगी आदित्यनाथ यांना फोन करून कुंभमेळ्यात उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली. तसंच या दुर्घटनेबाबत केंद्र सरकारकडून सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.
कुंभमेळ्यात नेमकं काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, संगम किनाऱ्यावर रात्री १ वाजताच्या सुमारास अचानक गोंधळ उडाला आणि लोक सैरावैरा धावू लागले. यावेळी बॅरिकेड्स तुटून चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच ४० ते ५० जण जखमी झाल्याचे समजते. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमृत स्नान रद्द
चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुंभमेळा प्रशासनाने आखाडा परिषदेचे अध्यक्ष रविंद्रपुरी यांच्याशी चर्चा करून अमृत स्नान रद्द करण्याची विनंती केली होती. या विनंतीला प्रतिसाद देत अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांनंतर हे स्नान होणार असल्याची माहिती आहे.