उत्तराखंडमधील हरिद्वार येथील प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.
गढवाल विभागीय आयुक्त विनय शिंकर पांडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात मोठी गर्दी जमल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मी घटनास्थळी जाण्यासाठी रवाना होत आहे."
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मंदिरातील जिन्यावर घडली. विजेचा धक्का बसल्याने चेंगराचेंगरी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे की, मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जमले असताना ही चेंगराचेंगरी झाली. रविवार असल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती आणि अचानक झालेल्या गोंधळामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. दुर्घटनेनंतर मंदिर परिसरात गोंधळाचं वातावरण आहे.
दुर्घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाचं पथक जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करत आहेत. मृतांचा नेमका आकडा अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेला नाही, परंतु स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आलं आहे.