करुणानिधींच्या कुटुंबात भाऊबंदकी, मोठ्या भावाने स्टॅलिनविरोधात दंड थोपटल्याने द्रमुकमध्ये फूट अटळ
By बाळकृष्ण परब | Updated: January 4, 2021 17:23 IST2021-01-04T17:18:34+5:302021-01-04T17:23:15+5:30
Tamilnadu Politics News : करुणानिधींच्या द्रमुक पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले त्यांचे ज्येष्ठ पुत्र एम.के. अलागिरी यांनी बंधू आणि डीएमकेचे प्रमुख स्टॅलिन यांच्याविरोधात रणशिंग पुकारले आहे.

करुणानिधींच्या कुटुंबात भाऊबंदकी, मोठ्या भावाने स्टॅलिनविरोधात दंड थोपटल्याने द्रमुकमध्ये फूट अटळ
चेन्नई - तामिळानाडूमधील दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटंबामध्ये निर्माण झालेले मतभेद राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी अधिकच तीव्र होऊ लागले आहेत. करुणानिधींच्या द्रमुक पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले त्यांचे ज्येष्ठ पुत्र एम.के. अलागिरी यांनी बंधू आणि डीएमकेचे प्रमुख स्टॅलिन यांच्याविरोधात रणशिंग पुकारले आहे. रविवारी मदुराईमध्ये एक मोठ्या रोड शोच्या माध्यमातून अलागिरी यांनी राजकारणात पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत.
रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या रोड शो दरम्यान, अलागिरी यांनी बंधू स्टॅलिन यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच स्टॅलिन हे कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाही, आपले समर्थक असे होऊ देणार नाही, असा दावाही केला. यावेळी अलागिरी यांच्या समर्थकांनी अंजा नेंजम म्हणजे बहादूर हृदयाचा माणूस अशा घोषणा दिल्या.
माजी केंद्रीय मंत्री आणि एम. करुणानिधी यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या अलागिरी यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आपण लवकरच पुढील वाटचालीची घोषणा करणार असून, कार्यकर्त्यांनी त्यांचा निर्णय मान्य करावा असे आवाहन केले. मी असं काय वाईट केलं होतं ज्यामुळे माझी द्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच भाऊ स्टॅलिन यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप त्यांनी केला.
मला पदाची हाव कधीही नव्हती. मल पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राहायचे होते. मी अनेक वेळा डीएमकेला वाचवलं आहे. मात्र स्टॅलिन यांनी पक्षामध्ये पदाच्या महत्त्वाकांक्षेसाठी माझा वापर करून घेतला. मी सात वर्षे गप्प राहिलो. मात्र आता मी नव्या पक्षाची स्थापना करावी, अशी माझ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्यावर मी लवकरच निर्णय घेणार आहे. मात्र मी जो काही निर्णय घेईन. तो तुम्ही स्वीकारावा, अशी माझी अपेक्षा आहे, असे अलागिरी यांनी सांगितले.