नेपाळमधील तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने देशातील परिस्थिती गंभीर झाली. याचदरम्यान, नेपाळच्या १८ जिल्ह्यांतील तुरुंगातून सुमारे ६ हजार कैदी पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यातील पाच कैद्यांनी भारत-नेपाळ सीमेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न केला, पण सशस्त्र सीमा दलाने त्यांना सिद्धार्थनगर परिसरात अटक केली.
नेपाळमधील तुरुंगातून पळून गेलेल्या पाच कैद्यांना सशस्त्र सीमा दलाने अटक केली आहे. सिद्धार्थनगर परिसरातील भारत-नेपाळ सीमेवर या कैद्यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे.
दरम्यान, अटक केलेल्या कैद्यांनी नेपाळमधील परिस्थिती खूप वाईट असून लोकांची हत्या केली जात असल्याचा दावा केला. 'आम्ही भारतीय तुरुंगात राहू, पण नेपाळला जाणार नाही,' असेही त्यांनी म्हटले. पुढील तपासासाठी या कैद्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यामुळे 'जनरेशन-झेड' (Gen-Z) तरुणांचा संताप वाढला आहे. या आंदोलनाला 'जेन झी रिव्होल्यूशन' असे नाव देण्यात आले असून, यात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाले आहेत. काठमांडूमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष झाला. संतप्त आंदोलकांनी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या दमक येथील घरावर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने काठमांडूमध्ये कर्फ्यू लावला आहे. संसद भवनाच्या आसपास आणि राजधानीत मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.