भारत- श्रीलंका तणावामुळे श्रीलकंन क्रिकेट टीम मायदेशी परतली
By Admin | Updated: August 4, 2014 12:36 IST2014-08-04T12:03:34+5:302014-08-04T12:36:39+5:30
श्रीलंकेच्या संरक्षणखात्याच्या वेबसाईटवर भारताविषयी असलेल्या आक्षेपार्ह मजकूराच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादानंतर श्रीलंकेच्या १५ वर्षांखालील क्रिकेट संघाला मायेदशी परत पाठवण्यात आले आहे.

भारत- श्रीलंका तणावामुळे श्रीलकंन क्रिकेट टीम मायदेशी परतली
ऑनलाइन टीम
चेन्नई, दि. ४ - सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेच्या १५ वर्षांखालील क्रिकेट संघाला मायेदशी परत पाठवण्यात आले आहे. हा संघ चेन्नईतील जेएम हारून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रविवारी रात्री शहरात दाखल झाला होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ही स्पर्धा खेळण्यास मनाई करण्यात आली व मायदेशी परत पाठवण्यात आले.
श्रीलंकेच्या संरक्षणखात्याच्या वेबसाईटवर भारत, तसेच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याविषयी असलेल्या आक्षेपार्ह मजकूराच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादानंतर चेन्नई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मच्छिमारांच्या प्रश्नावरून अनेक पत्रे लिहिली आहेत. या पत्रांचा उल्लेख करताना श्रीलंकेच्या वेबसाईटवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत या नेत्यांबाबत टिप्पणी करण्यात आली होती. यामुळे गदारोळ निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन संघाला परत पाठवण्यात आले.
दरम्यान श्रीलंकेच्या स्पोर्ट्स टीमला चेन्नईवरून परत पाठवण्यात आल्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वी २०१२ साली जयललिता यांनी श्रीलंकेच्या फूटबॉल संघाला परत जाण्यास सांगितले होते.