पाटणा : बिहार विधान परिषदेतील राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) आठपैकी पाच आमदारांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सत्ताधारी जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केल्याने आणि पक्षाचे एक संस्थापक सदस्य व राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनीही पक्षत्याग केल्याने लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाला मंगळवारी मोठा धक्का बसला.बिहार विधानसभेच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत. त्याआधी राष्ट्रीय जनता दलात फूट पडणे हा लालूप्रसाद यादव यांच्यासाठी मोठा धक्काच मानला जात आहे. निवडणुकीआधी यादव यांच्या पक्षाला असेच धक्के देत राहण्याचा प्रयत्न नितीशकुमार व भाजप करील, असे सांगण्यात येत आहे.एस. एम. कमर, संजय प्रसाद, राधा शरण सेठ, रणविजय कुमार सिंह आणि दिलीप राय या ‘राजद’च्या पाच आमदारांनी विधान परिषदेचे प्रभारी सभापती अवधेश नारायण सिंह यांना भेटून पक्षांतराची अधिकृत पत्रे त्यांना दिली. या पाच आमदारांच्या वेगळ्या गटास व त्या गटाच्या ‘जदयू’मधील विलीनीकरणास मान्यता देण्यात आल्याचे सभापती सिंह यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाची लागण झाल्याने पाटण्याच्या एका रुग्णालयात दाखल असलेल्या रघुवंश प्रसाद सिंह यांनी पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र पक्षाला पाठविले.>मांझीही सोडणार आघाडीबिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थान अवाम मोर्चाचे संस्थापक जीतन राम मांझी यांनीही आपला पक्ष जनता दल युनायटेडमध्ये विलीन करण्याची तयारी चालवल्याची चर्चा आहे. सध्या ते राजद व काँग्रेस यांच्या आघाडीत होते. पूर्वी ते नितीशकुमार यांच्या पक्षामध्ये होते. नितीशकुमार यांनीच त्यांना मुख्यमंत्री केले होते; पण त्यांनी पुढे राजीनामा न दिल्याने त्या दोघांत वैमनस्य निर्माण झाले होते.
पाच आमदार फुटल्याने लालूप्रसाद यादवांच्या ‘राजद’ला मोठा दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:21 IST