तेल मंत्रालयाची ‘गुपिते’ विकणारे ‘हेर’ अटकेत
By Admin | Updated: February 20, 2015 12:40 IST2015-02-20T02:24:15+5:302015-02-20T12:40:05+5:30
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील धोरणविषयक गोपनीय कागदपत्रे बाहेर नेऊन विकल्याच्या आरोपावरून मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांसह एकूण ५ जणांना अटक केली

तेल मंत्रालयाची ‘गुपिते’ विकणारे ‘हेर’ अटकेत
कॉर्पोरेट हेरगिरी झाली उघड
हरीश गुप्ता - नवी दिल्ली
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील धोरणविषयक गोपनीय कागदपत्रे बाहेर नेऊन विकल्याच्या आरोपावरून मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांसह एकूण ५ जणांना अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुरुवारी रात्री तेल आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित एका बहुराष्ट्रीय कंपनीसह काही खासगी कंपन्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या.
आशाराम आणि ईश्वर हे तेल मंत्रालयातील दोन कर्मचारी आणि लालटन प्रसाद, राकेश कुमार व राजकुमार चौबे या आणखी तिघांना सुरुवातीला ताब्यात घेण्यात आल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले. मात्र मंत्रालयातील गोपनीय कागदपत्रे बाहेर नेऊन कोणत्या कंपन्यांना विकण्यात आली आणि त्या कागदपत्रांचे नेमके स्वरूप काय होते, याचा तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. तसेच शुक्रवारी न्यायालयासमोर किती जणांना हजर करणार याबाबतही तपास यंत्रणेने मौन बाळगले आहे.
मंत्रालयाचे शास्त्री भवन येथील कार्यालय बंद झाल्यावर हे लोक बनावट ओळख दाखवून आत जात, ड्युप्लिकेट चाव्या वापरून आॅफिस उघडत, हवी ती कागदपत्रे बाहेर नेऊन त्याच्या छायाप्रती काढून त्या काही कन्सलटन्ली फर्मना विकत असत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अटक केलेल्यांवर दंड विधानाअन्वये अवैध प्रवेश करणे, चोरी व फसवणूक यासारखे गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र ‘आॅफिशियल सिक्रेट््स अॅक्ट’ अन्वये गुन्हा नोंदविला गेला नाही, यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुळात पोलीस या प्रकरणाचा तपास गेले तीन दिवस करीत आहेत. पण बाहेर नेली गेलेली कागदपत्रे गोपनीय स्वरूपाची होती की नाही, याविषयी पोलीस आयुक्तांनी काही सांगितले नाही. पोलीस आयुक्त म्हणाले की, कागदपत्रे कोणाला दिली गेली हे आम्ही हुडकून काढले आहे व त्यांचाही तपास केला जात आहे. आयुक्त म्हणाले की, गोपनीय माहिती मिळाल्याने सास्त्री भवनमध्ये सापळा लावून आधी मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात गेतले गेले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे इतर तिघे सापडले.
रिलायन्स म्हणते....
खरे तर पोलिसांनी या प्रकरणी कोणत्याही कासगी कंपनीचा नामोल्लेख केला नाही. मात्र रिलायन्स इन्डस्ट्रिजच्या प्रवक्त्याने खुलासा करताना सांगितले की, आमच्या एका कर्मचाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे आम्हाला कळले आहे. पण याहून अधिक माहिती आमच्याकडे नाही. आम्हीही आमच्या कठोर निकषांनुसार अंतर्गत चौकशी करीत आहोत. पोलीस तपासात आम्ही सर्व ते सहकार्य करू. खरे तर सर्वच महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये आमची सरकारसोबत आंतरराष्ट्रीय लवादात कारवाई सुरु आहे. त्याचा लवकर व न्याय्य पद्धतीने निपटारा व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे.
पेट्रोलियम मंत्री धमेंद्र म्हणाले की, हा प्रकार म्हणजे आमच्या कारभाराला बट्टा नाही. गेल्या सरकारच्या काळात असे प्रकार सर्रास उघडपणे चालायचे. आम्ही सत्तेवर आल्यापासून सतर्कता वाढविली व संशयितांवर पाळत ठेवली म्हणून हे उघड झाले. कोणाचीही गय केली जाणार नाही, याची खात्री बाळगावी.