स्मार्टफोनने वाढली पर्यटनाची गती
By Admin | Updated: April 27, 2016 04:58 IST2016-04-27T04:58:40+5:302016-04-27T04:58:40+5:30
यावर्षीच्या सुट्ट्यांतील पर्यटनाचे सर्वाधिक बुकिंग हे मोबाईलच्या माध्यमातून होत असल्याचे दिसून आले आहे.

स्मार्टफोनने वाढली पर्यटनाची गती
मुंबई : देशात स्मार्टफोनच्या झपाट्याने होणाऱ्या विस्ताराचे अनेक फायदे आता समोर येत असून उपलब्ध माहितीनुसार यावर्षीच्या सुट्ट्यांतील पर्यटनाचे सर्वाधिक बुकिंग हे मोबाईलच्या माध्यमातून होत असल्याचे दिसून आले आहे.
पर्यटन विषयात काम करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेने भारतातील पर्यटनासंदर्भात केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, २०१५ च्या तुलनेत यंदाच्या वर्षी पर्यटनाची जी बुकिंग झाली आहे, त्यामध्ये मोबाईलवरून होणाऱ्या बुकिंगच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत ११.५ टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या सुट्टीच्या हंगामाकरिता जी एकूण बुकिंग झाली आहे, त्यापैकी ६७ टक्के बुकिंग ही आॅनलाईन झाली असून उर्वरित ३३ टक्के बुकिंग प्रत्यक्ष ट्रॅव्हल कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन लोकांनी केली आहे.
पर्यटनाची सेवा देणाऱ्या आॅनलाईन कंपन्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, या कंपन्यांतील स्पर्धेमुळे ग्राहकांना अधिकाधिक आकर्षक आॅफर्स मिळत आहेत. त्यामुळे स्वाभाविकच ग्राहकांना याचा फायदा होत आहे. इंटरनेटवरून होणाऱ्या बुकिंगचे वाढते प्रमाण आणि डेस्कटॉप अथवा लॅपटॉप किंवा टॅब्लेटच्या तुलनेत मोबाईलवरून वाढलेला इंटरनेटचा वापर लक्षात घेत, आता पर्यटन कंपन्यांनी आपले अॅप्स सादर करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, या अॅप्सच्या माध्यमातून अधिकाधिक जोमाने जाहिरातबाजी होत असून यामुळेच मोबाईलवरून होणारे बुकिंग वाढल्याचे विश्लेषण तज्ज्ञांनी केले आहे. (प्रतिनिधी)
>वित्तीय व्यवहारांची विक्रमी कामगिरी
४केवळ विविध सेवांच्या वापरासाठी स्मार्टफोनचा वापर वाढत नसून मोबाईलच्या माध्यमातून होणाऱ्या वित्तीय व्यवहारांनीही विक्रमी कामगिरी केली आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१५-१६ या आर्थिक वर्षात मोबाईल बँकिंगच्या वापरात ४६ टक्क्यांची वाढ नोंदवीत गेल्या आर्थिक वर्षात ५२ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
४ मोबाईलमुळे होणारे बँकिंग अथवा मोबाईल वॅलेटच्या माध्यमातून होणारे व्यवहार वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे दैनंदिन सुविधेच्या अनेक आस्थापनांची आता मोबाईलशी जोडणी झाली आहे. या माध्यमाला प्रमोट करण्यासाठी या कंपन्याही अधिकाधिक सूट योजना राबवीत आहेत. याचाच फायदा मोबाईलवरून होणाऱ्या वित्तीय व्यवहारांची संख्या वाढण्यात झाला आहे.
>दूरध्वनी ग्राहकांची संख्या पोहोचली १०५ कोटीवर
देशामध्ये फोनसेवेचा विस्तार झपाट्याने होत असून फोन ग्राहकांच्या संख्येने १०५ कोटी १८ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी वायरलेस फोनचा वाटा लक्षणीय आहे. यामध्ये ०.८५ टक्के वाढ झाली असून आता ही ग्राहक संख्या १०१ कोटी ७९ लाखांवरून १०२ कोटी ६६ लाखांवर पोहोचली आहे.
जानेवारी २०१६ पर्यंतची ही आकडेवारी आहे. तर वायरलाईन ग्राहकांच्या संख्येत दोन कोटी ५३ लाखांवरून दोन कोटी ५२ लाख अशी एक लाखाची घट झाली आहे.