बोडो गनिमांविरुद्धची मोहीम गतिमान
By Admin | Updated: December 26, 2014 23:48 IST2014-12-26T23:48:15+5:302014-12-26T23:48:15+5:30
नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलँड (एस) (एनडीएफबी)च्या दहशतवाद्यांविरुद्ध लष्कराने आसामातील सीमेसह अरुणाचल प्रदेशात आपली तपास मोहीम अधिक गतिमान

बोडो गनिमांविरुद्धची मोहीम गतिमान
गुवाहाटी : नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलँड (एस) (एनडीएफबी)च्या दहशतवाद्यांविरुद्ध लष्कराने आसामातील सीमेसह अरुणाचल प्रदेशात आपली तपास मोहीम अधिक गतिमान केली आहे. लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, आसाममध्ये लष्कराची मोहीम निश्चितपणे गतिमान करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
बोडो दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसक हल्ल्यानंतर तेथील परिस्थिती पाहण्यासाठी केलेल्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर सिंग यांनी सुहाग यांची भेट घेतली होती. या दहशतवाद्यांनी गेल्या काही दिवसांत आदिवासींवर केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या आता ८१ झाली आहे.
सुहाग यांनी, लष्कराची ६६ पथके आसामात तैनात केल्याचे सांगितले. यातल्या प्रत्येक पथकात ७० जवान आहेत. सर्वाधिक हिंसाग्रस्त असलेल्या सोनितपूरमध्ये अधिक जवान तैनात केले गेले आहेत, असे यावेळी सांगितले. गृहमंत्र्यांनी भूतान व म्यानमारच्या लष्करासोबत एनडीएफबीबाबत चर्चा केल्याचे सुहाग पुढे म्हणाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएफबी (एस) च्या दहशतवाद्यांनी मंगळवारी रात्री केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन व्यक्तींचे शनिवारी निधन झाले.
दहशतवाद्यांसोबत कोणतीही चर्चा केली जाणार नाही, असे गृहमंत्री राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले असून दहशती कृत्य अजिबात सहन केले जाणार नाही असे धोरण राबविले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोनितपूर जिल्ह्यात व आसाम-अरुणाचल प्रदेशाच्या सीमेवर सुरक्षा जवानांनी आपल्या मोहिमांचा वेग वाढविला आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टर्सद्वारेही या सर्व क्षेत्राची पाहणी केली जात आहे. (वृत्तसंस्था)