Special Vande Bharat Train For Jammu And Kashmir: वंदे भारत ट्रेनची क्रेझ अद्यापही भारतीय प्रवाशांमध्ये कायम आहे. वंदे भारत ट्रेनची सेवा देशभरात सुरू आहे. प्रवाशांकडून वंदे भारत ट्रेनला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीने भारतीय रेल्वेने एक नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. प्रवाशांचे हित लक्षात घेता भारतीय रेल्वेने वंदे भारत ट्रेनची वैविध्यपूर्ण प्रकार आणले. यामध्ये अमृत भारत ट्रेन, वंदे भारत मेट्रो यांचा समावेश आहे. जम्मू आणि श्रीनगर या मार्गावर उभारण्यात आलेल्या सर्वांत उंच चिनाब ब्रिजवरून ताशी ११० किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनची चाचणी यशस्वी झाली. यानंतर आता जम्मू काश्मीरसाठी विशेष वंदे भारत ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे. अनेक वैशिष्ट्ये असलेली ही ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे सांगितले जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील हवामान, होणारी बर्फवृष्टी आणि आव्हानात्मक संचलन अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन नवीन वंदे भारत ट्रेनची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हिवाळ्यात जम्मू काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असली तरी उणे तापमान आणि बर्फवृष्टीमुळे रेल्वे सेवा कायम ठेवणे तसेच त्यात अधिकाधिक सुविधा देणे अतिशय कठीण होऊन बसते. अशा अनेक बाबींचा विचार ही नवीन वंदे भारत ट्रेन तयार करताना करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नवीन वंदे भारत ट्रेनसंदर्भात एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ट्रेनच्या वैशिष्ट्यांविषयी सांगण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरसाठी खास वंदे भारत ट्रेन तयार, नेमके काय वेगळे असेल?
नवीन वंदे भारत ट्रेन खूपच खास असणार आहे. या ट्रेनमध्ये अनेक गोष्टींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. ट्रेनच्या वॉटर टँकमध्ये सिलिकॉन हिटिंग पॅड आणि हिटिंग प्लंबिंग पाइप बसवण्यात आले आहेत. या तंत्रज्ञानामुळे यातील पाणी गोठणार नाही. या ट्रेनच्या पायलट केबिनमध्ये ट्रिपल एअर विंडस्क्रीन पाहायला मिळणार आहे. या केबिनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी ट्रेनच्या चालकासाठी हिटरची सुविधा असणार आहे. यामुळे अतिशय कमी तापमानतही ट्रेनचे सारथ्य करण्यात अडचण येणार नाही. तसेच या ट्रेनच्या वॉशरुममध्ये हिटरची सोय देण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर या ट्रेनच्या आत अनेक ठिकाणी हिटिंगची सुविधा देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेल्या पोस्टनुसार, लवकरच सर्वांत उंच चिनाब ब्रिजवरून वंदे भारत ट्रेन चालवली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये रेल्वे जाळे विस्तारण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून रेल्वेने कंबर कसली आहे. अनेक आव्हाने पार करत रेल्वे मार्गाचा विस्तार केला जात आहे. चिनाब ब्रिजवरून रेल्वेच्या चाचण्या यशस्वी होताना दिसत आहे. या मार्गावरून लवकरच देशाच्या मुख्य स्थानकांशी जोडणाऱ्या सेवा सुरू करण्याचा मानस रेल्वेचा आहे. तसेच स्लीपर वंदे भारतची सेवाही जम्मू-काश्मीरसाठी सुरू होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.