नवी दिल्ली:संसदेत गेले काही दिवस सातत्याने गदारोळ माजल्याने फारसे कामकाज होऊ शकले नव्हते. मात्र आता ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत सोमवारपासून तर राज्यसभेत मंगळवारी विशेष चर्चा होणार आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
१६ तास चालणाऱ्या या चर्चेचा कालावधी वाढू शकतो. त्या चर्चेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सहभागी होण्याची शक्यता आहे. या चर्चेच्या निमित्ताने विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तानमधील अणुयुद्ध टाळण्यासाठी आपण मध्यस्थी केली व दोन्ही देशांत शस्त्रसंधी घडवून आणली, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार करत आहेत. त्या मुद्द्यावरून विरोधक या चर्चेदरम्यान केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवू शकतात.
शिष्टमंडळातील खासदारही चर्चेत सहभागी
भारताची दहशतवादविरोधी भूमिका, ऑपरेशन सिंदूरचे महत्त्व या गोष्टींबाबत भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळांनी ३३ देशांचा दौरा करून तेथील नेत्यांशी चर्चा केली होती. हे खासदारही या चर्चेत सहभागी होतील. ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा व्हावी, ही विरोधकांची मागणी केंद्र सरकारने मान्य केली. मात्र, बिहारमधील मतदार यादीच्या विशेष तपासणी प्रक्रियेवर संसदेत चर्चा करण्यास केंद्र सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही.