लँडलाइनवरून बोला रात्रभर मोफत
By Admin | Updated: April 24, 2015 02:03 IST2015-04-24T02:03:07+5:302015-04-24T02:03:07+5:30
गेल्या काही वर्षांत घटलेल्या लँडलाइन फोनसेवेला संजीवनी देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने ग्राहकांसाठी रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत मोफत कॉल करण्याची अनोखी योजना जाहीर

लँडलाइनवरून बोला रात्रभर मोफत
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत घटलेल्या लँडलाइन फोनसेवेला संजीवनी देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने ग्राहकांसाठी रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत मोफत कॉल करण्याची अनोखी योजना जाहीर केली आहे. या योजनेची सुरुवात येत्या १ मेपासून होणार आहे.
या योजनेअंतर्गत बीएसएनएलच्या ग्राहकांना निश्चित केलेल्या वेळेत त्यांच्या लँडलाइन फोनवरून देशातील कोणत्याही नेटवर्कवरील लँडलाइन अथवा मोबाइलवर मोफत आणि अमर्याद संवाद साधता येईल. ग्राहकांचा कॉलिंग प्लॅन कोणताही असला तरी सर्वांना या सेवेचा लाभ घेता येईल, असे कंपनीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार बीएसएनएलच्या ग्राहकांनी फेब्रुवारीत सर्वाधिक लँडलाइन कनेक्शन बंद केल्याचे दिसून आले. सध्या कंपनीच्या ग्राहकांची संख्या ही १ कोटी ६६ लाख इतकी आहे. सातत्याने लँडलाइन ग्राहकांची संख्या घटूनही या श्रेणीत बीएसएनएल कंपनीची हिस्सेदारी ही ६२.२६ टक्के आहे. लँडलाइन सेवा वाढावी म्हणून बीएसएनएलने हा निर्णय घेतल्यानंतर मुंबई व दिल्लीत सेवा देणाऱ्या महानगर टेलिफोन लि. कंपनीतर्फेही अशीच सेवा देऊन सेवावाढीचा प्रयत्न होणार का, याकडे ग्राहकांचे लक्ष आहे.