दक्षिण चीन समुद्राकडे भारताची आगेकूच
By Admin | Updated: October 29, 2014 08:45 IST2014-10-29T02:13:00+5:302014-10-29T08:45:42+5:30
हायड्रोकार्बनने समृद्ध असलेल्या या समुद्रात आपली उपस्थिती वाढविण्याचा निर्णय घेत, दोन अतिरिक्त तेल आणि वायू ब्लॉकच्या संशोधनासंदर्भातील करारावर व्हिएतनामसोबत स्वाक्षरी केली़

दक्षिण चीन समुद्राकडे भारताची आगेकूच
नवी दिल्ली : दक्षिण चीन समुद्रावर चीनने सांगितलेल्या दाव्याला फारसे महत्त्व न देता,भारताने मंगळवारी हायड्रोकार्बनने समृद्ध असलेल्या या समुद्रात आपली उपस्थिती वाढविण्याचा निर्णय घेत, दोन अतिरिक्त तेल आणि वायू ब्लॉकच्या संशोधनासंदर्भातील करारावर व्हिएतनामसोबत स्वाक्षरी केली़ याशिवाय सुरक्षा, संरक्षण, व्यापार आणि दहशतवादाच्या मुद्यावर व्हिएतनामसोबत सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने आपली प्रतिबद्धता व्यक्त केली़
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे पंतप्रधान न्युन तंग जुंग यांच्यात हैदराबाद हाऊस येथे चाललेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल़े अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यावेळी उपस्थित होत़े द्विपक्षीय आणि क्षेत्रीय मुद्यांसह, सागरी व्यापार, परिवहन आदी मुद्यांवर यावेळी चर्चा झाली़ बैठकीनंतर भारत-व्हिएतनाम यांनी सात करारांवर स्वाक्षरी केली़ दक्षिण चीन समुद्रात एकत्र येऊन तेल आणि गॅस साठय़ांचा शोध आणि वापर करण्यावर यावेळी एकमत झाल़े भारताने व्हिएतनामला नौदल नौकांचा पुरवठा करण्याचा, तसेच यासाठी दहा कोटी अमेरिकन डॉलर कर्ज देण्याचीही घोषणा केली़ दक्षिण चीन समुद्रावरील चीनची दावेदारी झुगारून लावत, सागरी सुरक्षेत भारत आणि व्हिएतनामचे समान लाभ असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी म्हणाल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)