ज्वारी, मूग, उडिदाचा पेरा घटणार
By Admin | Updated: June 16, 2014 20:04 IST2014-06-16T19:55:07+5:302014-06-16T20:04:07+5:30
मागील दोन वर्षांत अतिवृष्टी आणि वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे परिसरात ज्वारी, मूग आणि उडीद या पिकांच्या पेर्यात घट होण्याची शक्यता आहे.

ज्वारी, मूग, उडिदाचा पेरा घटणार
भंडारज बु.: मागील दोन वर्षांत अतिवृष्टी आणि वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे झालेले नुकसान लक्षात घेता यावर्षी पातूर तालुक्यातील भंडारज बु. परिसरात ज्वारी, मूग आणि उडीद या पिकांच्या पेर्यात घट होण्याची शक्यता आहे.
पातूर तालुक्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. उडीद, मूग, ज्वारी अशी सर्वच खरीप पिके नेस्तनाबूद झाली. त्यातच वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे या पिकांचे अधिकच नुकसान झाले आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडला. शासनाच्या अजब निकषांमुळे अनेक शेतकर्यांना झालेल्या पीक नुकसानीसाठी आर्थिक मदतही मिळाली नाही. याच कारणांमुळे उडीद, मूग, ज्वारी या पिकांबाबत शेतकर्यांचा मोहभंगच झाल्याचे दिसत आहे. त्याउलट सोयाबीन हे कमी खर्चाचे आणि कमी वेळेत येणारे पीक असल्यामुळे यंदा सोयाबीनच्या पेर्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पातूर तालुक्यात सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने प्रसंगी कपाशीला पाणी देणेही शेतकर्यांना शक्य होते, त्यामुळे काही प्रमाणात कपाशीचाही पेरा वाढू शकतो. दुसरीकडे पावसाचे प्रमाण थोडेही वाढले, तर उडीद, मूग या पिकांना फटका बसतो, त्यांचा दर्जा आणि उत्पादनही खालावते. त्याशिवाय परिसरात मोठ्या प्रमाणात असलेले रोही, हरीण, माकडे, रानडुकरे आदी वन्यप्राण्यांमुळेही मूग, उडीद या पिकांचे नुकसान होत असते. गत दोन-तीन वर्षांपासून परिसरातील शेतकर्यांना हा अनुभव येत असल्यामुळेच यंदा मूग, उडीद ही पिके पेरण्याचे धाडस शेतकरी करणार नसल्याचे दिसते.