उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील १५०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या एका मोठ्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या रवींद्रनाथ सोनी याच्या बनावट नेटवर्कचा प्रचार केल्याच्या आरोपामध्ये अभिनेता सोनू सूद आणि पैलवाद द ग्रेट खली यांची नावं समोर आली आहेत. कानपूर पोलिसांनी या प्रकरणी सोनू सूद आणि खली यांना नोटिस बजावली आहे. या प्रकरणात ७०० हून अधिक लोक हे फसवणुकीचे शिकार झाले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त रघुवीर प्रसाद यांनी दिली आहे.
दिल्लीतील मालवीय नगर येथील रहिवासी असलेल्या रवींद्रनाथ सोनी याने सुमारे ७ वर्षांपूर्वी फसवणुकीचं एक जाळं पसरवलं होतं. त्याची मुख्य कंपनी ब्लूचिप कमर्शियल ब्रोकर २०१८ पासून सक्रिय होती. त्यासोबत ब्लूचिप इन्व्हेस्टमेंट आणि त्यासारख्या आणखी १६ इतर कंपन्याही सक्रिय होत्या.
त्याने रियल इस्टेट आणि सोन्याच्या खाणींच्या क्षेत्रात उच्च लाभाचं आमिष दाखवून गुंतवणुकदारांना आकर्षित करून फसवणूक केली होती. या फसवणुकीमधील ९० टक्के पीडित हे भारतामधील आहेत. तर नेपाळ, व्हिएतनाम, जपान आणि संयुक्त राष्ट्र अमेरिका सारख्या देशांतील १० टक्के परदेशी नागरिकही या प्रकरणात फसवणुकीचे शिकार झाले आहेत.
गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी सोनी याने दुबईमध्ये बुर्ज खलिफाजवळ एक आलिशान ऑफिस उघडले होते. तिथे मोठमोठे कार्यक्रम आयोजित व्हायचे. दरम्यान, या प्रकरणी दुबईत तक्रार झाल्यानंतर तो वेशांतर करून दुबईतून फरार झाला आणि ओमानमार्गे भारतात आला. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.