सोनिया गांधींना स्वतंत्र विचारांची व्यक्ती पंतप्रधानपदी नको होती - शरद पवार
By Admin | Updated: December 11, 2015 17:09 IST2015-12-11T16:37:30+5:302015-12-11T17:09:23+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना स्वतंत्र विचारांची व्यक्ती पंतप्रधानपदी नको होती असा दावा शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.

सोनिया गांधींना स्वतंत्र विचारांची व्यक्ती पंतप्रधानपदी नको होती - शरद पवार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - पंतप्रधानपदी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना स्वतंत्र विचारांची व्यक्ती नको होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या 'लाईफ ऑन माय टर्मस' या आत्मचरित्रात केला आहे. कालच गुरुवारी दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला होता. स्वत: सोनिया गांधी या पुस्तक प्रकाशन सोहळयाला उपस्थित होत्या.
१९९१ मध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये असताना त्यांना पंतप्रधानपदाची संधी होती. मात्र त्यावेळी सोनिया गांधींच्या निकटवर्तीय असणा-या नेत्यांनी पवारांपेक्षा नरसिंहराव कसे योग्य आहेत ते पटवून दिले. दिवंगत काँग्रेस नेते अर्जून सिंह त्यावेळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. मात्र त्यांनीही पवारांपेक्षा राव कसे योग्य आहेत ते १० जनपथला पटवून दिले असा दावा शरद पवारांनी या पुस्तकातील एका अध्यायात केला आहे. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार संरक्षणमंत्री होते.
पंतप्रधानपदासाठी त्यावेळी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर, अन्य राज्यातही माझ्या नवाची चर्चा होती. पण मी सावध होतो. १० जनपथ म्हणजेच सोनिया गांधींच्या मतावर बरेच काही अवलंबून आहे याची मला कल्पना होती. त्यावेळी निवडणुकीपूर्वी पी.व्ही. नरसिंहराव यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. पण त्यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आणि राजीव गांधी यांच्या अकाली निधनामुळे त्यांना परत बोलवावे असे काहींनी सल्ला दिला होता असे पवारांनी आत्मचरित्रात म्हटले आहे.
शरद पवार पंतप्रधानपदी विराजमान झाले तर, गांधी कुटुंबाच्या हिताला बाधा पोहोचेल असे त्यावेळी सोनिया गांधींशी निष्ठावंत असणा-या नेत्यांचे मत होते. नरसिंह रावांच्या तुलनेत मी तरुण असल्यामुळे दीर्घकाळ पंतप्रधानपदी रहाण्याची भिती काँग्रेस नेत्यांना सतावत होती.
त्यामुळे एम.एल फोतेदार, आर.के.धवन, अर्जुन सिंह, अर्जुन सिंह आणि व्ही. जॉर्ज या काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना नरसिंह राव यांना पाठिंबा देणे योग्य राहील हे पटवून दिले. अर्जुन सिंह स्वत: पंतप्रधानपदासाठी इच्छुक होते. राव यांच्यानंतर आपण पंतप्रधान बनू असे त्यांना वाटत होते असे शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.