सोनिया गांधी आक्रमक पवित्र्यात
By Admin | Updated: March 21, 2015 23:50 IST2015-03-21T23:50:10+5:302015-03-21T23:50:10+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षकार्यात अधिक आक्रमकपणे सहभागी होत शनिवारी हरियाणातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली व राजस्थानला एक दिवस आधीच भेट दिली.
सोनिया गांधी आक्रमक पवित्र्यात
नबीन सिन्हा - नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षकार्यात अधिक आक्रमकपणे सहभागी होत शनिवारी हरियाणातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली व राजस्थानला एक दिवस आधीच भेट दिली.
सोनिया गांधी यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना पुरेशी भरपाई मिळण्यासाठी लढण्याचे आश्वासन दिले, तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पुढे दामटू इच्छित असलेल्या भूसंपादन विधेयकाच्या सध्याच्या स्वरूपाबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना सावध केले. या मुद्यावर पक्ष रान उठवेल आणि हाच मुद्दा पक्षात पुन्हा नवचैतन्य भरील, असे ज्येष्ठ नेते राज बब्बर यांनी सांगितले.
भूसंपादन विधेयकाच्या विरोधात १६ मार्च रोजी युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या निदर्शनांना राहुल गांधी उपस्थित राहतील, असे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी जाहीर केले होते; परंतु तसे झाले नाही. विविध युनिटनी केलेल्या सूचनांचे आणि स्थितीचे ते विश्लेषण करीत आहेत. ते परतल्यानंतर पक्ष व्यापक जनसंपर्क कार्यक्रम जाहीर करील, तसेच जनतेशी संबंधित मुद्यांबाबत रान उठवण्यात येईल, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
मागील आठवड्यापासून सोनिया गांधी पक्षकार्यात अधिक आक्रमकपणे सहभागी झाल्या आहेत. विरोधकांनी राष्ट्रपती भवनावर काढलेल्या मार्चचे त्यांनी नेतृत्व केले. त्यापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निवासस्थानी पदयात्रा काढली होती. कोळसा घोटाळ्यात मनमोहनसिंग यांना समन्स बजावण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.
बंगळुरू येथे एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात घेण्याचा प्रस्ताव असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या अधिवेशनाबाबत सध्या ज्येष्ठ नेतेही काही बोलत नाहीत. राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष म्हणून या अधिवेशनात बढती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
अधिवेशन बोलावण्यासाठी किमान एक महिना आधी नोटीस काढणे आवश्यक असल्याने, ते लांबणीवर पडू शकते, असे समजते. सध्या पक्षांतर्गत निवडणुका घेण्यात येत असून, जूनअखेरपर्यंत त्या संपतील आणि त्यानंतरच उच्चस्तरावरील बदल होण्याची शक्यता आहे, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.