गिरीराज सिंगाना दुर्लक्षित करून सोनियांनी झटकले
By Admin | Updated: April 2, 2015 15:00 IST2015-04-02T14:21:42+5:302015-04-02T15:00:49+5:30
संकुचित मनोवृत्तीच्या लोकांच्या वक्तव्यावर काहीही बोलणार नाही असे सांगत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वर्णद्वेषी वक्तव्ये करणा-या गिरीराज सिंग यांना अनुल्लेखाने मारले.

गिरीराज सिंगाना दुर्लक्षित करून सोनियांनी झटकले
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत वर्णद्वेषी वक्तव्ये करणा-या गिरीराज सिंग यांना अनुल्लेखाने मारत सोनिया गांधींनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. ' एवढ्या संकुचित मनोवृत्तीच्या लोकांच्या वक्तव्यावर काहीही बोलणे माझ्यासाठी कठीण आहे', असे सांगत सोनिया यांनी गिरीराज सिंग यांना झटकले.
राजीव गांधी यांनी जर नायजेरियन मुलीशी लग्न केले असते आणि सोनिया गांधी जर गौरवर्णीय नसत्या तर काँग्रेसने त्यांचे नेतृत्व स्वीकारले असते काय, अशी मुक्ताफळे गिरीराज सिंग यांनी उधळली होती. त्यावर सर्वच स्तरांमधून जोरदार टीका होत असून या वर्णद्वेषी वक्तव्याचा राग फक्त देशवासीयांपुरता मर्यादित न राहता नायजेरियाच्या भारतातील राजदूतानेही त्यावर टीका केली. बिहारमधील स्थानिक पत्रकारांनी राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर गिरीराज सिंह यांना प्रश्न विचारला होता. यावर प्रतिक्रिया देताना गिरीराज सिंह यांनी अत्यंत बेजबाबदार विधान केले.गिरीराज सिंह यांच्या टीकेचा सूर महिलेच्या रंगावर आधारीत होता. सोनिया गांधी या गो-या असल्याने त्यांना काँग्रेसने अध्यक्ष म्हणून स्वीकारले असे गिरीराज सिंह यांचे म्हणणे होते. गिरीराज सिंह यांच्या या विधानाचा काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला.