सोमनाथ भारतींना केव्हाही अटक
By Admin | Updated: September 22, 2015 22:40 IST2015-09-22T22:40:23+5:302015-09-22T22:40:23+5:30
आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात दाखल केलेल्या प्रकरणात भारती यांना अंतरिम

सोमनाथ भारतींना केव्हाही अटक
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात दाखल केलेल्या प्रकरणात भारती यांना अंतरिम जामीन देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिल्याने त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यांचा शोधही सुरू केला आहे. दरम्यान, भारती सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
भारती यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर लगेच पोलीस कामाला लागले. त्यांचे कार्यालय व निवासस्थानी धाडी घातल्या, परंतु भारतींचा थांगपत्ता लागला नाही. भारती यांनी आपला फोनही बंद ठेवला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
तत्पूर्वी न्यायालयाने भारती यांची याचिका फेटाळली. भारती यांच्या अटकेची शक्यता असली तरी आणखी काही कायदेशीर पर्याय खुले असल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने गेल्या १७ सप्टेंबरला न्यायालयाचा आदेश येईपर्यंत भारती यांना अटकेपासून दिलासा देताना आपला आदेश राखून ठेवला होता. सोबतच रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गेल्याबद्दल भारती यांना कडक शब्दात फटकारले होते. त्यांना पोलीस ठाण्यात जाणे एवढे आवडत असेल तर मीच त्यांना येथून पाठवेल, असे न्यायालयाने म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)