स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी केली. यावेळी, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना वीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून फटकारले. 'राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. खुद्द महात्मा गांधी यांनीही सावरकरांचा सन्मान केला आहे. एवढेच नाही तर, त्यांची आजी इंदिरा गांधी यांनीही त्यांना पत्र लिहिले होते.'
सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधींना इशारा -राहुल गांधींना इशारा देताना सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास समजून घेतल्याशिवाय आपण अशा प्रकारची विधाने करू शकत नाही. राहुल गांधींनी भविष्यात अशा प्रकारचे विधान केले तर, आम्ही स्वतःहून त्याची दखल घेऊ आणि सुनावणी करू. आपल्याला स्वातंत्र्य देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आपण असे कसे वागू शकता? यावेळी सावरकर आहेत, पुढच्या वेळी कुणी म्हणेल की, महात्मा गांधी इंग्रजांचे नोकर होते.' याच वेळी, भविष्यात अशी विधाने करू नका, असा इशाराही न्यायालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दिला.
खंड पीठानं राहुल गांधींच्या वकिलाला विचारले असा प्रश्न -न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने, राहुल गांधी यांना भविष्यात अशा प्रकारची विधाने करू नयेत, असा इशारा दिला आहे. यावेळी न्यायालयाने राहुल गांधींचे वकील अभिषेक सिंघवी यांना, 'महात्मा गांधीही ब्रिटिशांशी संवाद साधताना "आपला विश्वासू सेवक" सारखे शब्द वापरायचे, हे राहुल गांधींना माहित आहे का?' असा सवालही केला.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधातील राहुल गांधी यांच्या याचिकेवर तक्रारकर्ता आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटिस जारी केली आहे. तत्पूर्वी, विनायक दामोदर सावरकर यांच्याविरुद्ध टिप्पणी केल्याबद्दल दंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेले समन्स रद्द करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला होता. यामुळे राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.राहुल गांधींवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १५३ अ (शत्रूत्वाला प्रोत्साहन देणे) आणि कलम ५०५ (सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधाने) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या विरुद्ध हा खटला वकील नृपेंद्र पांडे यांनी दाखल केला होता, ज्यांनी राहुल गांधींवर महाराष्ट्रातील अकोला येथील एका रॅलीदरम्यान जाणूनबुजून सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप केला होता.