Mahakumbh Stampede Updates: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात बुधवारी (२९ जानेवारी) चेंगराचेंगरीची घटना घडली. यात दहापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले. काही मुद्दे राहुल गांधींनी अधोरेखित केले असून, त्याकडे लक्ष देण्याचा सल्लाही दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
त्रिवेणी संगमावर चेंगराचेंगरीची घटना घडली. घटनेतील मृतांबद्दल शोक व्यक्त विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोयी, सुविधा आणि व्यवस्थापनाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
राहुल गांधी चेंगराचेंगरीच्या घटनेवर काय म्हणाले?
विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पोस्टमध्ये म्हटले आहे, "प्रयागराज महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने अनेक लोकांचा मृत्यू आणि असंख्य लोक जखमी झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करतो आणि जखमींची प्रकृती तातडीने सुधारावी अशी आशा व्यक्त करतो."
व्यवस्था सुधारायला हवी -राहुल गांधी
"या दुःखद घटनेसाठी चुकीची व्यवस्था, व्यवस्थेतील उणीवा आणि सर्वसामान्य भाविकांऐवजी व्हीआयपींकडे जास्त लक्ष देणे, या गोष्टी जबाबदार आहेत. अजून महाकुंभ मेळ्याचा भरपूर वेळ बाकी आहे. आणखी महास्नान व्हायचे आहेत. आज घडली तशीच घटना पुढे होऊ नये, यासाठी सरकारने व्यवस्था सुधारायला हवी", असा सल्ला राहुल गांधींनी सरकारला दिला आहे.
"व्हीआयपी संस्कृतीला लगाम लावायला हवा आणि सरकारने सर्वसामान्य भाविकांच्या आवश्यक गरजांसाठी आणखी चांगली व्यवस्था करायला हवी. काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आवाहन करतो की, त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना मदत करावी", असे आवाहनही राहुल गांधींनी केले आहे.
मौनी अमावस्या असल्याने २९ जानेवारी रोजी रात्री १.३० वाजता प्रयागराजमध्ये भाविक मोठ्या संख्येने आले. त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी एकाच वेळी गर्दी झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. यातील मृतांची ओळख पटवण्याचे काम आता सुरू आहे.