...म्हणून चिंताग्रस्त भाजपाने बेदींना निवडले - आरएसएस
By Admin | Updated: February 3, 2015 11:15 IST2015-02-03T10:44:49+5:302015-02-03T11:15:33+5:30
दिल्लीत जनमत फारसे अनुकूल दिसत नसल्याने चिंताग्रस्त भाजपाने किरण बेदींची 'मुख्यमंत्री'पदाची उमेदवार म्हणून घोषणा केल्याची कबुली 'ऑर्गनायझर' या संघाच्या मुखपत्रात देण्यात आली.

...म्हणून चिंताग्रस्त भाजपाने बेदींना निवडले - आरएसएस
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - राजधानी दिल्लीत जनमत फारसे अनुकूल दिसत नसल्याने चिंताग्रस्त भारतीय जनता पक्षाने किरण बेदींना पक्षात आणत त्यांची 'मुख्यमंत्री'पदाची उमेदवार म्हणून घोषणा केल्याची कबुली 'ऑर्गनायझर' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात देण्यात आली आहे. तसेच या लेखात भाजपाला धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. किरण बेदींची भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून निवड करण्यात आल्यानंतर पक्षात व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आणि थोडा तणावही होता. त्यानंतर खुद्द संघाकडूनच बेदींच्या नेमणुकीचे कारण पुढे आले आहे. 'बेदींच्या नेमणुकीमुळे मोठ्या प्रमाणात पंजाबी मते भाजपाच्या वाट्यास येतील. दिल्लीत सध्या कायदा व सरक्षा व्यवस्थेचा स्तर घसरत असून, महिलांवरील अत्याचारांतही वाढ होताना दिसत आहे त्यापार्श्वभूमीवर आणि पोलिस अधिकारी असताना बेदी यांनी केलेल्या कामामुळे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्या (बेदी) बाजूने मतदान करेल' अशी अपेक्षा लेखात व्यक्त करण्यात आली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी अवघ्या ४९ दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने दिल्लीकरांमध्ये फसवले गेल्याची भावना असून ते दुखावले गेले आहेत, त्यामुळे त्यांची कठीण परीक्षा आहे. मात्र असे असले रीब वर्गातून आपला अधिका पाठिंबा मिळू शकतो, अशी शक्यता असल्याचे लेखात म्हटले आहे. भाजपासाठीची स्थितीही दिल्लीत फारशी समाधानकारक नसून, ही फारशी चांगली बाब नाही, हे लक्षात आल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी किरण बेदींना पक्षात आणण्याचा निर्णय घेतल्याचे लेखात म्हटले आहे. तसेच भाजप नेत्यांकडून होणा-या नकारात्मक टीकेबाबातही लेखातून समज देण्यात आली आहे. ' नरेंद्र मोदींमुळे सोशल नेटवर्किंग साईट्स व सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या भाजपा नेत्यांनी ट्विटर व फेसबूकवर नकारात्मक कॉमेंट्स कमी केल्या पाहिजेत', असा सल्लाही देण्यात आला आहे.