जनता परिवारातील सहा पक्ष एका झेंड्याखाली
By Admin | Updated: December 5, 2014 02:02 IST2014-12-05T02:02:37+5:302014-12-05T02:02:37+5:30
जनता परिवारातील पूर्वाश्रमीच्या सहा पक्षांनी एका झेंड्याखाली एकजूट होत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.

जनता परिवारातील सहा पक्ष एका झेंड्याखाली
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
जनता परिवारातील पूर्वाश्रमीच्या सहा पक्षांनी एका झेंड्याखाली एकजूट होत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. २२ डिसेंबरनंतर समाजवादी पक्ष, जेडीयू, आरजेडी, आयएनएलडी, जेडीएस यासारख्या पक्षांचे विलीनीकरण होत असून नव्या ‘समाजवादी जनता दल’ या पक्षाचे नेतृत्व मुलायमसिंग यादव यांच्याकडे राहील, असे संकेत मिळाले आहेत.
मुलायमसिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तीन तास चाललेल्या बैठकीत नव्या पक्षाच्या स्थापनेसंबंधी सर्व औपचारिकता पूर्ण करण्याची जबाबदारी आणि सर्वाधिकार त्यांना बहाल करण्यात आले. या बैठकीला मुलायमसिंग यांच्यासह नितीशकुमार, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद, जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, जद (एस)चे नेते एच.डी. देवेगौडा, आयएनएलडीचे दुष्यंत चौटाला, एसजेपीचे कमल मोरारका उपस्थित होते.
दिल्लीत २२ डिसेंबर रोजी संसदेबाहेर संयुक्त धरणे देण्याचा निर्णय झाला असल्याचे बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या बैठकीनंतर घोषणा करताना सांगितले. डाव्या पक्षांसह अन्य पक्षांनाही धरण्यांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसही सहभागी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.