नागपूरसह सहा नव्या आयआयएमला मंजुरी
By Admin | Updated: June 25, 2015 00:14 IST2015-06-25T00:14:23+5:302015-06-25T00:14:23+5:30
एमबीएला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी देशात सहा नव्या आयआयएमला (भारतीय व्यवस्थापन संस्था) मंजुरी दिली

नागपूरसह सहा नव्या आयआयएमला मंजुरी
नवी दिल्ली : एमबीएला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी देशात सहा नव्या आयआयएमला (भारतीय व्यवस्थापन संस्था) मंजुरी दिली असून त्यात महाराष्ट्रातून नागपूरचा समावेश आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासूनच या संस्था विविध व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू करतील.
विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), बोधगया (बिहार), सिरमोर (हिमाचल प्रदेश), सम्बलपूर (ओडिशा) आणि अमृतसर (पंजाब) या उर्वरित पाच नव्या आयआयएम आहेत. प्रत्येक संस्थेत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून कॅटमार्फत प्रवेशप्रक्रिया पार पाडली जाईल.
दरवर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ केली जाणार असून सात वर्षानंतर प्रत्येक संस्थेतील विद्यार्थ्यांची संख्या ५६० विद्यार्थ्यांपर्यंत वाढविली जाईल, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जारी निवेदनात म्हटले आहे.
पश्चिम ओडिशामध्ये आयआयएम देण्याची मागणी सातत्याने होत होती. सम्बलपूरच्या संस्थेच्या रूपाने ती पूर्ण करण्यात आली आहे. यापूर्वी ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरला आयआयएम देण्याचा प्रस्ताव होता.
(लोकमत न्यूज नेटवर्क)