केंद्रीय मंत्रिमंडळात येणार सहा नवे चेहरे
By Admin | Updated: November 7, 2014 05:09 IST2014-11-07T05:09:59+5:302014-11-07T05:09:59+5:30
जलस्रोत आणि गंगा स्वच्छता विभागाचे प्रमुख आलोक रावत यांची प्रशासकीय सुधार आयोग या कमी महत्त्वाच्या विभागामध्ये बदली केली आहे

केंद्रीय मंत्रिमंडळात येणार सहा नवे चेहरे
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना संरक्षणमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करून घेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार पक्का असतानाच सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री श्रीपाद यस्सो नाईक यांची खराब कामगिरी पाहता त्यांचे खाते बदलण्याची शक्यता आहे. रविवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात हे बदल अपेक्षित आहेत. एकंदर सहा नव्या चेहऱ्यांचा समावेश होईल असे दिसते. यात पर्रीकरांखेरीज यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत, मुख्तार अब्बास नक्वी, अनुराग ठाकूर आणि हंसराज अहिर या भाजपा नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. हरियाणा किंवा राजस्थानातून एखाद्या जाट नेत्याला मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे.
जलस्रोत आणि गंगा स्वच्छता विभागाचे प्रमुख आलोक रावत यांची प्रशासकीय सुधार आयोग या कमी महत्त्वाच्या विभागामध्ये बदली केली आहे. त्यांच्या जागी आता शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू यांच्याकडे नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदासोबतच गंगा योजनेचे प्रमुखपदही दिले जाण्याची शक्यता आहे. प्रकाश जावडेकर यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाण्याची शक्यता आहे. परंतु पदोन्नतीत त्यांना संसदीय कामकाज किंवा अन्य खाते सोडावे लागू शकते. सीतारामन यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले.