केंद्र सरकारने नुकत्याच पारित करून घेतलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात देशातील काही भागात विरोध होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, संतप्त जमावाने जाळपोळ, दगडफेक करत सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. तसेच या हिंसाचारादरम्यान, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुर्शिदाबादमध्ये परिस्थिती तणावपूर्ण असून, या हिंसाचारावरून भाजपाने राज्यातील ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच येथील भयावह परिस्थितीमुळे अनेक हिंदू कुटुंब पलायन करत आहेत, असा आरोपही केला आहे.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील काही भागात मागच्या काही दिवसांपासून वक्फविरोधात हिंसक विरोध आंदोलनं होत आहेत. यादरम्यान, हिंसक जमावाने शनिवारी पिता-पुत्रासह तीन जणांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. हे पिता-पुत्र हिंदू-देवी देवतांच्या मूर्ती घडवायचे अशी माहिती समोर आली आहे, दरम्यान, हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी बीएसएफच्या आठ कंपन्या आणि सुमारे एक हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये डीजींपासून ते एएसपी स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
यादरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात नवा वक्फ बोर्ड सुधारणा कायदा राज्यात लागू केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नसल्याचा आणि परिस्थिती खूपच गंभीर असल्याचा आरोप केला आहे.
मुर्शिदाबाद हिंसाचारावरून सुवेंदू अधिकारी यांनी दावा केला की, धार्मिक कट्टरतावाद्यांच्या भीतीमुळे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील धुलियन क्षेत्रामधून ४०० हून अधिक हिंदूंनी आपलं घर सोडणं भाग पडलं आहे. भयग्रस्त कुटुंबांनी नदी पार करून माल्दा जिल्ह्यातील बैष्णवनगर येथील देओनापूर-सोवापूर ग्रामपंचायत क्षेत्रामधील ग्रामपंचायत क्षेत्रातील लालपूर हायस्कूलमध्ये आश्रय घेतला आहे.