सिमीच्या दहशतवाद्यांनी लावले मोदींविरोधी नारे
By Admin | Updated: May 19, 2014 03:39 IST2014-05-19T03:39:26+5:302014-05-19T03:39:26+5:30
सिमीच्या अटकेत असलेल्या संशयित दहशतवाद्यांनी शनिवारी भोपाळच्या न्यायालय परिसरात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा दिल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सिमीच्या दहशतवाद्यांनी लावले मोदींविरोधी नारे
भोपाळ : स्टुडंन्टस् इस्लामिक मुव्हमेंट आॅफ इंडिया (सिमी)च्या अटकेत असलेल्या संशयित दहशतवाद्यांनी शनिवारी भोपाळच्या न्यायालय परिसरात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा दिल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रतिबंधित सिमीच्या या कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर, त्यांना न्यायालय परिसरातच उभ्या असलेल्या पोलीस वाहनाकडे नेले जात असताना या कार्यकर्त्यांनी मोदींविरोधी नारे लावले. ‘अब की बार मोदी का नंबर है’अशा घोषणा त्यांनी दिल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या सिमीच्या या १५ कार्यकर्त्यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस त्यांना परत तुरुंगाच्या वाहनाकडे नेत असताना खंडवा तुरुंगातून फरार झालेला अबू फैजल याने मोदींविरोधात नारेबाजी सुरू केली. फैजलने नारेबाजी सुरू करताच अन्य कार्यकर्त्यांनीही त्याच्यासोबत नारे लावायला सुरुवात केली. ‘दुनिया की एकही ताकद अल्ला है. तालिबान आयेगा और नरेंद्र मोदी जायेंगा’ आणि ‘अब की बार मोदी की बारी है’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. पोलिसांनी या सर्वांना वाहनात घालून नंतर तुरुंगात नेले. (वृत्तसंस्था)