सिक्किमचा विक्रम अबाधित!
By Admin | Updated: February 11, 2015 02:16 IST2015-02-11T02:16:30+5:302015-02-11T02:16:30+5:30
विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये अनेक स्थानिक पक्षांनी यशाचा झंझावात निर्माण करून एकतर्फी निवडणुका जिंकण्याचा विक्रम केला आहे

सिक्किमचा विक्रम अबाधित!
वसंत भोसले, कोल्हापूर
विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये अनेक स्थानिक पक्षांनी यशाचा झंझावात निर्माण करून एकतर्फी निवडणुका जिंकण्याचा विक्रम केला आहे. विरोधकांना किमान १० टक्के जागा जिंकून अधिकृत विरोधी पक्षाचे स्थानही मिळू दिलेले नाही. तसाच प्रकार आज (मंगळवारी) दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) ७०पैकी ६७ जागा जिंकून घडवून आणला असला तरी सिक्किममधील २००९च्या निवडणुकीत सिक्किम डेमॉक्रॅटीक फ्रंटने नोंदविलेला विक्रम अबाधित आहे. या पक्षाने सिक्किम विधानसभेच्या ३२पैकी ३२ जागा जिंकल्या होत्या. असा विक्रम देशातील कोणत्याही विधानसभेत व कोणत्याही पक्षाने आजवर नोंदवलेला नाही.
देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५२पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भारतीय राज्यघटनेनुसार होत आलेल्या आहेत. त्या निवडणुकांचे निकाल संख्याशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यासाचे आणि मनोरंजनाचेही आहेत. आपल्या देशात २९ राज्य विधानसभा आणि २ केंद्रशासित (दिल्ली आणि पाँडेचेरी) विधानसभा आहेत. यापैकी महाराष्ट्र, आसाम, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, सिक्किम, आणि आता दिल्लीच्या निवडणुकीत एखाद्या पक्षाने एकतर्फी निवडणुका जिंकून सत्ता हस्तंगत केली आहे. महाराष्ट्रात पहिल्या विधानसभा निवडणुकीत १९६२मध्ये काँग्रेसने २६४पैकी २१५ जागा जिंकल्या होत्या. किमान २६ जागा जिंकून विरोधीपक्षाचे स्थान कोणत्याही पक्षाला मिळविता आले नव्हते.
प्रजा समाजवादी पक्षाला ९, समाजवादी १, शेतकरी कामगार पक्ष १५, रिपब्लिकन ३, कम्युनिस्ट पक्षाला ६ जागा मिळाल्या होत्या तर उर्वरित १५ जागा अपक्षांनी जिंकल्या होत्या. असाच विक्रम १९९१मध्ये तामिळनाडूत जयललिता यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकने काँग्रेसबरोबर आघाडी करून निवडणूक लढवताना केला आहे. या आघाडीने तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांपैकी २२४ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी १६८ जागा जिंकणाऱ्या अण्णा द्रमुकला १६४ तर काँग्रेसने ६५ जागा लढवत ६० जागा जिंकल्या होत्या. एम. करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ द्रमुक पक्षाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले होते.