पश्चिम सिक्कीममधील यांगथांग मतदारसंघातील अप्पर रिम्बी येथे मध्यरात्री झालेल्या भूस्खलनात चार जणांचा मृत्यू आणि तीन जण बेपत्ता आहेत. भूस्खलनाची माहिती मिळताच पोलीस आणि एसएसबी जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांसह तात्काळ बचावकार्य सुरू केले. तसेच स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
एसपी गेझिंग त्शेरिंग शेर्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री घडली. भूस्खलनात अडकून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, बचाव पथकाने दोन महिलांना वाचवले. दोघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. दुसऱ्या महिलेची प्रकृती गंभीर आहे. तीन जण अजूनही बेपत्ता आहेत.
दरम्यान, सिक्कीमच्या ग्यालशिंग जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भूस्खलनात एका महिलेचा मृत्यू झाला. बिष्णू माया पोर्टल (वय, ४५) असे मृत महिलेचे नाव असून ती थांगसिंग गावात राहत होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पावसामुळे परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. या घटनेत मृत महिलेचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. भूस्खलनाचा धोका अजूनही खूप जास्त असल्याने जिल्हा अधिकाऱ्यांनी संवेदनशील भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या सल्ल्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.