सरकारच्या गोल्ड योजनेत सिध्दीविनायक मंदिर ४० किलो सोने गुंतवणार
By Admin | Updated: December 9, 2015 12:22 IST2015-12-09T11:41:45+5:302015-12-09T12:22:54+5:30
देशातील प्रसिध्द आणि श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या मुंबईतील सिद्धीविनायक देवस्थानाने आपल्या जवळील ४० किलो सोने केंद्र सरकारच्या गोल्ड मॉनिटायझेशन स्किममध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे

सरकारच्या गोल्ड योजनेत सिध्दीविनायक मंदिर ४० किलो सोने गुंतवणार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - देशातील प्रसिध्द आणि श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या मुंबईतील सिद्धीविनायक देवस्थानाने आपल्या जवळील ४० किलो सोने केंद्र सरकारच्या गोल्ड मॉनिटायझेशन स्किममध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. यातून देवस्थानाला वर्षाला ६९ लाख रुपयांचे व्याज मिळणार आहे.
सिध्दीविनायक देवस्थानाच्या पावलावर पाऊल टाकून तिरुमाला आणि शिर्डी ही देवस्थानेही असा निर्णय घेतला तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वकांक्षी गोल्ड मॉनिटायझेशन स्किमच ते मोठ यश ठरेल. आतापर्यंत या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला असून, फक्त ४०० ग्रॅम सोने जमा झाले आहे. एका अंदाजानुसार देशात ५२ हजार कोटींचे २० हजार टन सोने देशात पडून आहे.
मंदिर व्यवस्थापन लवकरच दागिन्याच्या रुपात जमा असलेले सोने वितळवण्यासाठी सरकारी टाकसाळमध्ये पाठवणार आहे. सोने वितळवून सोन्याची बिस्कीटे बनवण्यात येतील . वितळवल्यानंतर जवळपास ३० किलो सोने असेल. १० ग्रॅम सोन्याची किंमत २५ हजार आहे. यानुसार ७.५ कोटी रुपयाच्या सोन्यावर वर्षाला ६९ लाख रुपये व्याज मिळेल. या योजनेत सरकारकडून २ ते २.५ टक्के व्याज मिळणार आहे.
सिद्धीविनायक देवस्थानाकडे सध्या १६५ कोटी सोने जमा आहे. त्यातील वार्षिक १ टक्के व्याजावर १० किलो सोने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ठेवण्यात आले आहे. भाविकांकडून देणगीरुपात जमा होणा-या काही वस्तूंचा लिलाव करणे ट्रस्टला बंधनकारक आहे. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सिद्धीविनायकाच्या चरणी दरवर्षी मोठया प्रमाणावर दागिने, रोख रक्कम अर्पण केली जाते. यातून जमा होणारा निधी सामाजिक कार्यासाठी वापरला जातो.