सिद्धरामय्यांनी बीफ खाल्ल्यास त्यांचे मुंडके उडवीन - भाजपा नेत्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2015 17:33 IST2015-11-03T17:24:05+5:302015-11-03T17:33:05+5:30
मला बीफ खायचे असल्यास कोणीही रोखू शकत नाही, असे म्हणणा-या कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मुंडके उडवण्याची धमकी कर्नाटकमधील एका स्थानिक भाजपा नेत्याने दिली आहे.

सिद्धरामय्यांनी बीफ खाल्ल्यास त्यांचे मुंडके उडवीन - भाजपा नेत्याची धमकी
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. ३ - मला बीफ खायचे असल्यास कोणीही रोखू शकत नाही, असे वक्तव्य करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मुंडके उडवण्याची धमकी कर्नाटकमधील स्थानिक भाजपा नेते एस.एन. चनाबसप्पा नेत्याने दिल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे. बीफच्या मुद्यावरुन देशभरात गदारोळ सुरू असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 'मला बीफ खायचे असल्यास मी ते खाणारच, मला कोणीही त्यापासून रोखू शकत नाही' असे विधान केले होते. मात्र भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे निकटवर्तीय असलेले चनाबसप्पा यांना सिद्धरामय्या यांचे हे वक्तव्य बिलकूल पसंत पडले नसून आपण त्याचे शीर उडवू असे त्यांनी म्हटले आहे.
'जर सिद्धरामय्या यांच्या अंगात हिंमत असेल तर त्यांनी शिमोगा येथे येऊन बीफ खाऊन दाखवावे. आम्ही त्यांना सोडून देऊ असे जर त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे. त्यांनी एखादी गाय मारून दाखवली तर आम्ही त्यांच्या धडापासून त्यांचे शीर वेगळं करू आणि त्याचा फूटबॉल बनवून खेळू' असे खालच्या पातळीचे वक्तव्य चनाबसप्पा यांनी केले आहे.
मी आत्तापर्यंत कधीच बीफ खाल्लेलं नाही, पण जर मला त्याची चव आवडली आणि जर मला ते खायचे असेल तर मी ते खाणारच. ( ते खाण्यापासून) मला कोणीही थांबवू शकत नाही' असे वक्तव्य सिद्धरामय्या यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. देशात अशाप्रकारे घालण्यात आलेली बंदी विचित्र असल्याचेही सांगत त्यांनी बीफ बंदीवर कडाडून टीका केली होती.