गोव्यात श्रीराम सेनेला प्रवेश नाही - पर्रीकर

By Admin | Updated: August 13, 2014 03:05 IST2014-08-13T03:05:16+5:302014-08-13T03:05:16+5:30

गोव्यात श्रीराम सेनेला काम करू दिले जाणार नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले.

Shriram Sena does not have access to Goa - Parrikar | गोव्यात श्रीराम सेनेला प्रवेश नाही - पर्रीकर

गोव्यात श्रीराम सेनेला प्रवेश नाही - पर्रीकर

पणजी : गोव्यात श्रीराम सेनेला काम करू दिले जाणार नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. शून्य प्रहरावेळी अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी तियात्र (नाटक) दिग्दर्शक तौसिफ शेख यांना येत असलेल्या धमक्यांबाबतचा विषय उपस्थित केला होता. ‘आकांतवादी गोंयांत नाका’ या तियात्राच्या सादरीकरणास विरोध आहे. ‘मुतालिक’ असे नाव सांगून एकाने आपल्यास धमकी दिल्याची तक्रार शेख यांनी दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
त्यावर पर्रीकर म्हणाले की, मुतालिक हुबळी येथे राहतात. त्यांची श्रीराम सेना कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटक सरकारने संघटनेवर बंदी लागू करावी म्हणून गोव्यातील विरोधी आमदारांनी प्रयत्न करावेत. मी गोव्यात श्रीराम सेनेला काम करू देणार नाही.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय,’ हे नाटक गोव्यात आले होते, त्यावेळीही त्यास काहीजण आक्षेप घेत होते व आता तियात्राला आक्षेप घेतला जातो. काहीवेळा तियात्रांमध्ये आक्षेपार्ह गोष्टींचा समावेश केला जातो, हेही खरे आहे. मी त्याचा अनुभव घेतला आहे, असे ते म्हणाले.
दाणे टाकून कोंबड्यांना भांडण्यास भाग पाडण्याची एक पद्धत आहे. श्रीराम सेना व तियात्रच्या अनुषंगाने तसाच प्रकार गोव्यात सुरू आहे. प्रत्यक्षात काहीच घडलेले नाही. गोव्यात जर श्रीराम सेना आली, तर मी संघटनेवर बंदी घालेन, असा दावाही त्यांनी केला. (खास प्रतिनिधी)

Web Title: Shriram Sena does not have access to Goa - Parrikar