Ayodhya Ram Mandir: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख नेते आणि अयोध्येचे माजी खासदार डॉ. रामविलास दास वेदांती यांचे आज निधन झाले आहे. मध्य प्रदेशातील रीवा येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. डॉ. रामविलास दास वेदांती हे रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे सदस्य आणि वशिष्ठ आश्रमाचे पूज्य संत होते. त्यांच्या निधनावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री योगींची भावनिक श्रद्धांजली
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, “श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख आधारस्तंभ, माजी खासदार आणि अयोध्याधाम येथील वशिष्ठ आश्रमाचे पूज्य संत डॉ. रामविलास वेदांती जी महाराज यांच्या निधनाने आध्यात्मिक जगत आणि सनातन संस्कृतीसाठी मोठी हानी पोहोचली आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली. त्यांचे जाणे म्हणजे एका युगाचा अंत आहे. धर्म, समाज आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित त्यांचे त्यागमय जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना आहे की, दिवंगत पुण्यात्म्यास आपल्या चरणी स्थान मिळो आणि शोकाकुल शिष्य व अनुयायांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो.”
रीवामध्ये सुरू होती रामकथा, अचानक बिघडली प्रकृती
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. रामविलास दास वेदांती हे 10 डिसेंबर रोजी दिल्लीहून मध्य प्रदेशातील रीवा येथे रामकथेसाठी गेले होते. बुधवारी अचानक त्यांची तब्येत बिघडली, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्वतोपरी उपचार केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
रामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी नेतृत्व
डॉ. रामविलास दास वेदांती यांची गणना रामजन्मभूमी आंदोलनातील प्रमुख नेत्यांमध्ये केली जात होती. अयोध्येचे खासदार असताना त्यांनी संसदेत तसेच रस्त्यावर राम मंदिर उभारणीसाठी ठाम भूमिका मांडली होती. राम मंदिर आंदोलनात त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक मानले जाते.
अयोध्येतील रस्त्यांच्या नामांतराची मागणी
अलीकडेच त्यांनी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारकडे अयोध्येतील काही रस्त्यांची नावे बदलण्याची मागणी केली होती. मुस्लिम नावांवर असलेल्या रस्त्यांना श्रीराम आणि त्यांच्या पूर्वजांच्या नावांनी ओळख मिळावी, अशी त्यांची भूमिका होती. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, भगवान श्रीरामांचे भव्य मंदिर उभारण्यात आले, त्यावर भगवा ध्वजही फडकत आहे. आता अयोध्येतील रस्त्यांची नावे राजा दिलीप, राजा रघु आणि राजा दशरथ यांसारख्या श्रीरामांच्या पूर्वजांच्या नावावर असावेत.
Web Summary : Ram Janmabhoomi movement leader, Ramvilas Vedanti, passed away in Rewa. UP CM Yogi Adityanath expressed grief, noting Vedanti's significant contributions to spirituality, society and Ram Temple movement. He was a member of Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust.
Web Summary : राम जन्मभूमि आंदोलन के नेता रामविलास वेदांती का रीवा में निधन हो गया। यूपी के सीएम योगी आदित्यनाथ ने दुख व्यक्त करते हुए वेदांती के अध्यात्म, समाज और राम मंदिर आंदोलन में योगदान को सराहा। वे राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास के सदस्य थे।