मोदींनी पाठवलेल्या भेटीबद्दल शरीफ यांच्या कन्येने मानले आभार
By Admin | Updated: May 28, 2014 13:39 IST2014-05-28T11:07:34+5:302014-05-28T13:39:45+5:30
नवाझ शरीफ यांच्या आईसाठी पंतप्रधान मोदींनी भेट म्हणून शाल पाठवली असून यामुळे भावूक झालेल्या मरियम शरीफ यांनी मोदींचे आभार मानले.

मोदींनी पाठवलेल्या भेटीबद्दल शरीफ यांच्या कन्येने मानले आभार
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २८ - नवाझ शरीफ यांच्या आईसाठी पंतप्रधान मोदींनी भेट म्हणून शाल पाठवली असून यामुळे भावूक झालेल्या शरीफ यांच्या कन्या मरियम शरीफ यांनी मोदींचे आभार मानले. मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले शरीफ पाकिस्तानात परत निघाले असता मोदींनी त्यांच्या मातोश्रींसाठी एक शाल भेट दिली. मोदींच्या या कृतीमुळे शरीफ यांच्या कन्या मरियम अतिशय भावुक झाल्या व त्यांनी ट्विटरद्वारे मोदींचे आभारही मानले.
मंगळवारी मोदी व शरीफ यांची भेट झाल्यानंतर शरीफ पाकिस्तानात परत जाण्यासा निघाले असता मोदींनी त्यांना एक शाल भेट दिली. पाकिस्तानात आल्यावर शरीफ यांनी स्वत: ती भेट त्यांच्या आईला दिली. शरीफ यांच्या कन्येला हे कळताच त्यांनी या सुंदर भेटीसाठी ट्विटरवरून मोदींचे आभार मानले. 'प्रधानमंत्री मोदीजी, माझ्या आजीसाठी पाठवलेल्या या सुंदर 'शाली'साठी खूप खूप धन्यवाद. माझ्या वडिलांनी स्वत:च्या हाताने ती शाल आजीला दिली,' असे ट्विट मरियम यांनी केले. एवढेच नव्हे तर या ट्विटसोबत त्यांनी शालीचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या आईसोबतच्या फोटोंमुळे आपली आई अतिशय भावूक झाली होती, असे शरीफ यांनी भारत दौ-यादरम्यान मोदींना सांगितले होते. पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी मोदींनी त्यांच्या आईचे आशिर्वाद घेतले होते व त्यांच्या आईने मोदींना मिठाई भरवली होती.