साधू महंतांच्या आखाडयाबाहेर थाटली प्रसाद विक्रीची दुकाने
By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST
सिंहस्थ कुंभमेळा : साधुग्रामला यात्रेचे स्वरूप
साधू महंतांच्या आखाडयाबाहेर थाटली प्रसाद विक्रीची दुकाने
सिंहस्थ कुंभमेळा : साधुग्रामला यात्रेचे स्वरूपपंचवटी : रामकुंडावरील ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळयाच्या पर्वाला सुरूवात झाली असुन तपोवन साधुग्राममध्ये देखिल विविध आखाडयांचे साधुमहंत दाखल झाले आहेत. आखाडयांना जागा वाटपानंतर काही साधुमहंतांनी तळ ठोकला असल्याने भाविक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. आखाडयांच्या बाहेरील बाजुस नागरीकांनी तर पुजा साहित्य विक्री, आखाडयांच्या महंतांचे फोटो, नारळ, फुल, अगरबत्ती अशा विक्रीची दुकाने थाटल्याने सध्या साधुग्राम परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसुन येत आहे. आखाडयांसाठी काही साधूमहंतांना जागा मिळाल्याने काहींनी आपापले तंबू, मंडप तसेच राहुटया उभारण्याचे काम केले आहे तर काही काम अजुन सुरू आहे. ज्या आखाडयाच्या महंतांनी राहुटया तसेच मंडप उभारणी केली आहे त्याठिकाणी दैनंदिन भोजनावळी सुरू झाल्याने भाविक भोजनावळीसाठी तसेच साधुमहंतांच्या दर्शनासाठी रांगा लावत असल्याचे चित्र साधुग्राममध्ये बघायला मिळत आहे. तपोवन साधुग्राममध्ये ध्वजारोहणाच्या पुर्वीच साधूमहंतांची मोठी गर्दी होणार असुन तत्पुर्वी महिनाभर अगोदर दाखल झालेल्या साधु महंतांचे स्थानिक तसेच परजिल्हयातील भक्तगणांचा ताफा दाखल झाला आहे. साधुमहंतांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सिंहस्थ पर्वातील विविध धार्मिक कार्यक्रमांचे पत्रक वाटप करण्याचे काम सध्या सुरू आहे. (वार्ताहर)