मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका धार्मिक उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. डबरा येथील नवग्रह पिठाच्या कलश यात्रेदरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये एका महिला भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पोलीस आणि प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
'ती' एक चूक अन् किंकाळ्यांनी परिसर हादरला!
माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या पुढाकाराने डबरा येथे नवग्रह मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. १० फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात मंगळवारी भव्य कलश यात्रेने होणार होती. दुपारी १ वाजता ही यात्रा निघणार होती, मात्र पहाटे ९ वाजल्यापासूनच महिलांची गर्दी स्टेडियम मैदानावर जमली होती.
कलश वाटप सुरू होताच गर्दी अनियंत्रित झाली. यावेळी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी मैदानाचे एक गेट उघडले आणि लोक आत शिरताच ते अचानक पुन्हा बंद केले. या गोंधळात अनेक महिला एकमेकींच्या अंगावर पडल्या आणि दबल्या गेल्या. यात रती साहू (७०, रा. हनुमान कॉलनी) या महिलेचा मृत्यू झाला, तर विमला आणि कला बाथम या गंभीर जखमी झाल्या.
मृताच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप
"हा सर्व प्रकार पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे घडला आहे," असा आरोप मृत रती साहू यांच्या सुनेने केला आहे. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी अचानक गेट बंद केल्यामुळे महिला दबल्या गेल्या. जखमींना तातडीने डबरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र तिथे डॉक्टर वेळेवर हजर नव्हते. ऑक्सिजनची सोय नसल्यामुळे रती साहू अर्धा तास तडफडत होत्या आणि अखेर उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला.
माजी गृहमंत्री पोहोचले पोलीस ठाण्यात
या घटनेनंतर संतापलेले नातेवाईक मृतदेह घेऊन डबरा पोलीस ठाण्यात पोहोचले. घटनेची माहिती मिळताच माजी गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मात्र, इतक्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमासाठी प्रशासनाने पुरेशी व्यवस्था का केली नव्हती? आणि अचानक गेट बंद करण्याचा निर्णय कोणाचा होता? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या जखमी महिलांवर ग्वाल्हेरमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
Web Summary : A stampede during a religious procession in Gwalior resulted in one death and two injuries. Police mismanagement and sudden gate closure are blamed. Relatives allege negligence and demand action against responsible officers. An investigation is underway.
Web Summary : ग्वालियर में एक धार्मिक जुलूस के दौरान भगदड़ मच गई, जिसमें एक की मौत हो गई और दो घायल हो गए। पुलिस की कुप्रबंधन और अचानक गेट बंद करने को जिम्मेदार ठहराया गया है। परिजनों ने लापरवाही का आरोप लगाया है और जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की मांग की है। जांच जारी है।