बिहारमधील मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणातून धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनुसार, घरोघर जाऊन केलेल्या पुनरीक्षणात मतदारयाद्यांमध्ये मोठ्या संख्येने नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमारच्या नागरिकांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. या अभियानानंतर सुधारित मतदारयादी ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असून यातून अवैध प्रवाशांची नावे वगळली जाणार आहेत.
बूथनिहाय मतदारांची पडताळणी करण्यात आली आहे. यात या तिन्ही देशांतून भारतात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणूक होत असून या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांचे पुनरीक्षण सुरू आहे. विशेषत: या याद्यांमध्ये कथितरीत्या अवैध प्रवाशांची नावे समाविष्ट असल्याची शंका निवडणूक आयोगाला होती.
निवडणूक आयोगानुसार या अभियानात ८० टक्के मतदारांनी आपली संपूर्ण माहिती फॉर्मच्या स्वरूपात जमा केली आहे. यात मतदाराचे नाव, पत्ता, जन्मतारीख, आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र याचा समावेश आहे.
तेजस्वी यादव यांची टीका८० टक्के फॉर्म जमा झाल्याचा निवडणूक आयोगाचा दावा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी फेटाळून लावला आहे. अनेक ठिकाणी बनावट फॉर्म अपलोड केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.