धक्कादायक ! मंदिरातच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By Admin | Updated: April 2, 2017 22:34 IST2017-04-02T22:34:38+5:302017-04-02T22:34:38+5:30
ओडिशातील जगन्नाथ मंदिरात एका 11 वर्षाच्या दिव्यांग मुलीवर शुक्रवारी रात्री बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

धक्कादायक ! मंदिरातच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - ओडिशातील जगन्नाथ मंदिरात एका 11 वर्षाच्या दिव्यांग मुलीवर शुक्रवारी रात्री बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका 28 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलगी रात्री अकराच्या सुमारास देव दर्शनासाठी मंदिरात आली होती. रात्रीची वेळ असल्याने मंदिरात वर्दळही नव्हती. याचाच गैरफायदा घेत एका तरुणाने तिला चॉकलेटचे आमिष दाखवले आणि मंदिरातील स्नान मंडपात नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तो तिथून पळून गेला. त्याचवेळी मंदिरात आलेल्या एका व्यक्तीची नजर स्नान मंडपातून बाहेर पळणाऱ्या त्या नराधमावर गेली. नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याचा त्याला संशय आल्याने त्याने त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले.
त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संतप्त नागरिकांनी त्याला बदडून काढले व पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेचे वृत्त समजताच स्थानिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी काहीजणांनी रस्त्यावर उभी असलेली वाहनेही पेटवली. पण पोलिसांनी ताबडतोब परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर बारीपदाचे उपजिल्हाधिकारी एस. के. पुरोहित यांनी मुलीच्या औषधोपचारासाठी दहा हजार रुपयांचा मदतनिधी जाहीर केला आहे.