राजस्थानमधील धोलपूर जिल्ह्यातील बारी उपविभागातील कुहवानी गावात एकाच कुटुंबातील दोघांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. सर्वात आधी महिलेला हार्ट अटॅक आला आणि तिचा मृत्यू झाला. यानंतर महिलेच्या सासऱ्यांचंही हार्ट अटॅकने निधन झालं.
एकाच कुटुंबातील दोघांच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली आहे. कुहवानी गावातील मुरारी मीना यांच्या ६० वर्षीय पत्नी माया देवी यांचं हार्ट अटॅकने निधन झालं. माया देवी यांचा मुलगा सुरेश मीना दिल्लीत सरकारी शिक्षक म्हणून काम करतो. त्यामुळे गावकरी मुलगा येण्याची वाट पाहत होते आणि त्यानुसार अंत्यसंस्काराची तयारीही केली जात होती.
माया देवी यांचे ७७ वर्षीय सासरे गुलाब सिंह मीना हे गावकऱ्यांसोबत घरात बसले होते. अचानक गुलाब सिंह बेशुद्ध पडले. कुटुंबीयांनी त्यांना ताबडतोब बारी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं की गुलाब सिंह यांना हार्ट अटॅक आला आहे. डॉक्टरांनी त्यांना धोलपूर येथे रेफर केलं. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून ग्वाल्हेर येथे रेफर करण्यात आले. तिथेच त्यांचाही मृत्यू झाला.
सासरे आणि सुनेचं हार्ट अटॅकने निधन झाल्यानंतर गावात शोककळा पसरली. कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे. दोघांवर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. आजूबाजूच्या परिसरातील लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते.