इंग्लंडच्या रॉयल नेव्हीचे एफ-३५बी स्टेल्थ लाढाऊ विमान काही बिघाडामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून तिरुवनंतपुरम विमानतळावर उभे होते. आता हे विमान धावपट्टीवरून हँगरमध्ये हलवण्यात आले आहे. एफ-३५बी हॅन्गरमध्ये हलवल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभियंत्यांचा नवा चमू भारतात -आता हे लढाऊ विमान भारतातच दुरुस्त करायचे, की इंग्लंडला पाठवायचे, यासंदर्भातील निर्णय भारतात आलेला अभियंत्यांचा हा नवा चमू घेईल. हा चमू A400M अॅटलास विमानाने भारतात आला आहे. जर हे विमान दुरुस्त झाले नाही, तर ते सुटे करून C-17 ग्लोबमास्टर लष्करी विमानाने परत नेले जाईल.
जगातील सर्वात महागड्या विमानात समावेश -एफ-35बीची किंमत 110 मिलियन डॉलर म्हणजेच, 900 कोटी रुपयांहूनही अधिक आहे. तसेच हे जगातील सर्वात महागड्या लढाऊ विमानांमध्ये गणले जाते. या विमानात वापरण्यात आलेले स्टेल्थ तंत्रज्ञान अत्यंत गोपनीय मानले जाते. जेटचा प्रत्येक भाग काढण्याची आणि पुन्हा फीट करण्याची प्रक्रिया ब्रिटिश सैन्याच्या कडक देखरेखीतच होते.
एअर इंडियाने दिली होती ऑफर -हे विमान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) सुरक्षिततेत विमानतळावरील बी 4 मध्ये पार्क करण्यात याले होते. महत्वाचे म्हणजे, सुरुवातीलाच केरळमधील मान्सूनच्या पावसामुळे हे विमान हँगरमध्ये हलवण्यासंदर्भातील एअर इंडियाचा प्रस्ताव ब्रिटिश रॉयल नेवीने नाकारला होता. यानंतर, ब्रिटिश नौदलाने हे विमान हँगरमध्ये हलवण्यास सहमती दर्शवली.