शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

शताब्दीच्या उंबरठ्यावरील शिवशाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 23:00 IST

निराधार विधान करायचं नाही, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे.

- डॉ. सागर देशपांडे

पु. ल. देशपांडे यांनी म्हटलंय, ‘‘जगण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट मिळवावी लागते, ती म्हणजे जगण्याचं प्रयोजन. पुरंदऱ्यांना हे प्रयोजन वयाच्या १६व्या, १७व्या वर्षीच गवसलं, शिवचरित्र लिहिणं. हे प्रयोजन सापडल्यावर पुढल्या बिकट वाटांचे राजरस्ते झाले. एका ड्रॉइंग मास्तराच्या बळवंत नामक मुलाला शिवनेरीच्या शिवरायानं झपाटलं. त्या झपाटलेल्या अवस्थेतच त्यांच्या जीवनाचा प्रवास चालू आहे. यापुढंही चालणार आहे. इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे. पण त्याच्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे.

निराधार विधान करायचं नाही, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. त्यांच्या अंत:करणातला कवी मोहोरबंद-गोंडेदार भाषा लिहितो. पण हातातला इतिहासाचा लगाम सुटत नाही. वर्तमानाच्या रिकिबीतून पाय निसटत नाही, की नजर डळमळत नाही. हा इतिहासकार भूतकाळाइतकाच वर्तमानाशी जुळलेला आहे.’’ आजही वयाच्या ९९ व्या वर्षात पदार्पण करत असलेले बाबासाहेब ज्यावेळी बोलतात, गप्पा मारतात, त्यावेळी इतिहासातले दाखले अन् वर्तमानकाळात त्यांना आलेले गेल्या ८०-८५ वर्षांच्या आयुष्यातले अनुभव आपण ऐकू लागतो, अन् आपण एका दंतकथेच्या नायकाच्या सहवासातच आहोत की काय, असा भास होऊ लागतो.

‘स्मरणशक्ती’ हे बाबासाहेबांना लाभलेलं एक दैवी वरदानच म्हणावं लागेल. कारण वेद-उपनिषदांपासून ते संतसाहित्यापर्यंत प्राचीन अर्वाचीन इतिहासापासून ते नानासाहेब फाटक-शांता हुबळीकरांच्या अभिनयापासून ते मंगेशकर भावंडांच्या स्वर्गीय सुरांपर्यंत, शिवकालीन हत्यारांपासून ते दादरा-नगर हवेलीच्या युद्धभूमीवरील सुधीर फडके यांनी व्हायोलिनच्या केसमधून लपवून आणलेल्या लाइट मशीनगनपर्यंत, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वक्तृत्वाच्या कडाडणाºया तोफखान्यापासून ते डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या जगप्रसिद्ध शास्रज्ञाच्या संशोधनापर्यंत नेमक्या शब्दात तपशील मांडण्याचं अफाट कौशल्य बाबासाहेबांच्या मेंदूत विधात्यानं अशा कोणत्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संग्रहित केलंय कोण जाणे?

१९५४ साली दादरा-नगर हवेलीच्या रणसंग्रामात सुधीर फडके, यांच्यासह बाबासाहेबांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, पोर्तुगीजांविरुद्ध झालेल्या या सशस्र संग्रामाच्या दरम्यान दमणगंगेच्या काठी त्यांनी शिवचरित्रावर पहिलं प्रेरणादायी व्याख्यान दिलं, याचकाळात अफाट कष्ट घेऊन, दारिद्र्याचे आणि अपमानाचे चटके सोसून, प्रसंगी पुण्याहून मुंबईला भायखळ्याच्या बाजारात कोथिंबिरीच्या पेंड्या विकून त्यांनी शिवचरित्रासाठी पैसे जमवले. ‘राजा शिवछत्रपती’ या महाग्रंथाच्या रूपाने १९५७ मध्ये ते प्रकाशित झाले. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी खास बोलावून घेऊन त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला १९७४ मध्ये ३०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्तानं मुंबईत बाबासाहेबांनी उभारलेली शिवसृष्टी हा सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय झाला होता. पुढं १९८४ मध्ये ‘जाणता राजा’ हे महानाट्य आता मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांमधून रंगमंचावर आलं अन् गेल्या ३६ वर्षात भारतातील अनेक राज्यांमध्ये अन् खुद्द अमेरिकेतही त्याचे हजारांवर प्रयोग झाले. त्यांनी शिवचरित्रविषयक जगभरात दिलेली सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक व्याख्यानं, ‘जाणता राजा’चे शेकडो प्रयोग या साऱ्यांतून बाबासाहेबांनी मंदिरं, मशिदी, दर्गे, शाळा, ग्रंथालयं, इस्पितळं, रुग्णोपचार, भूकंपग्रस्त या व अशा अनेक गरजू व्यक्ती आणि प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची थेट मदत तर केलीच; पण या महानाट्यामुळे संयोजकांनी उभारलेल्या निधीतून अनेक मोठी विधायक कामं उभी राहू शकली.बाबासाहेबांना ‘शिवशाहीर’ ही उपाधी खुद्द सातारच्या राजमाता सुमित्राराजेंनी दिली.

बाबासाहेब शिवचरित्र अभ्यासपूर्वक सांगतात. त्यांचा त्यात अभिमान दिसून येतो. पण त्यात खोटा अभिनिवेश नसतो. ते शिवाजीमहाराजांची खोटी किंवा अतिशयोक्त स्तुती चुकूनही करत नाहीत. अफजलखान किंवा औरंगजेब यांची खोटी निंदाही करीत नाहीत. त्यांच्या भाषणात स्वराज्याच्या शत्रूंचेही खरे आणि श्रेष्ठ दर्जाचे गुण मुक्तकंठाने सांगितले जातात तर दुर्गुणांबद्दल स्वकीयांची धगधगत्या शब्दांत होरपळ उडवलेली दिसते. अफजलखानाच्या लहानमोठ्या सद्गुणांची माहिती बाबासाहेबांनी जेवढी दिलेली आढळते, तेवढी माहिती आदिलशाही दरबारातील मुहंमद नुश्रतीसारख्या शाही इतिहासकारानेही दिलेली आढळत नाही’’, अशा शब्दात राजमातांनी बाबासाहेबांना कौतुकाची शाबासकी दिली आहे.

स्वत:सह समोरच्या प्रत्येकातल्या ‘माणूस’पणाला जपणारा, शताब्दीच्या उंबरठ्यावरील एक शिवशाहीर म्हणून आपण सर्वजण त्यांना वर्षानुवर्षे ओळखतो. ‘शिवचरित्र’ हाच आपला श्वास मानणाºया बाबासाहेबांना आई जगदंबेनं आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य द्यावं हीच प्रार्थना !(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)ज्येष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे तिथीनुसार आज नागपंचमीस, तर तारखेनुसार २९ जुलै रोजी ९९व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्यानिमित्त...

टॅग्स :Babasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरे