तिकिटासाठी शिवसेनेत शह-काटशह
By Admin | Updated: September 23, 2014 00:30 IST2014-09-23T00:30:20+5:302014-09-23T00:30:20+5:30
कळवा-मुंब्य्रात आव्हाडांना घेरण्याच्या नादात आता शिवसेनेकडून या मतदारसंघात काँग्रेसमधील इच्छुकाने मुलाखत दिली आहे

तिकिटासाठी शिवसेनेत शह-काटशह
ठाणे : कळवा-मुंब्य्रात आव्हाडांना घेरण्याच्या नादात आता शिवसेनेकडून या मतदारसंघात काँग्रेसमधील इच्छुकाने मुलाखत दिली आहे. दुसरीकडे ठाणे शहर मतदारसंघात नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक यांच्यात तिकिटावरून दोन गट तयार झाले आहेत. त्यात ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरदेखील आरोपांच्या फैरी झडू लागल्याने या तीन मतदारसंघांत आता शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे.
कळवा - मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्यात घरात घेरण्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आले असून त्या दृष्टीने शिवसेनेने व्यूहरचनादेखील आखली आहे. त्यानुसार, मुलाखतीच्या वेळेस राष्ट्रवादीतून शिवसेनेत डेरेदाखल झालेले दशरथ पाटील आणि सुधीर भगत यांनी मुलाखती दिल्या आहेत. विशेष म्हणजे पाटील यांना शिवसेनेत आणण्यासाठी त्यांना सुरुवातीलाच कमिटमेंट दिली गेली होती. परंतु, आता शिवसेनेनेच ही कमिटमेंट तोडण्याचा घाट घातला आहे. वारंवार पक्ष बदलणाऱ्या काँग्रेसचे राजन किणे यांनी येथील जागेसाठी शिवसेनेतून मुलाखत दिल्याने पाटलांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. विशेष म्हणजे यामुळे येथील स्थानिक शिवसैनिक चांगलेच धास्तावले आहेत. परंतु, आता त्याचे परिणाम शिवसेनेला येथे भोगावे लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे आव्हाडांना येथे घेरण्याच्या नादात शिवसेनेत किणे यांच्या निमित्ताने ठिणगी पडल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे ठाणे शहर मतदारसंघातही ९ जण रेसमध्ये असले तरीदेखील तिकीट मिळवण्याची खरी रेस ही सभागृह नेते नरेश म्हस्के आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले रवींद्र फाटक यांच्यात असू शकते. फाटकांना तिकीट दिले तर निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांचा प्रचार न करण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे. तसेच अशोक वैती, अनंत तरे, गोपाळ लांडगे हेदेखील येथून
तिकीट मिळवण्याच्या रेसमध्ये आहेत. त्यामुळे येथे देखील आता फाटकविरोधी वातावरण निर्माण झाले असून निष्ठावान विरुद्ध फाटक असा काहीसा सामना येथे तिकीट मिळण्यापूर्वीच रंगला आहे. त्यामुळे कोणाच्या पारड्यात तिकीट पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ओवळा-माजिवडा मतदारसंघातही आता प्रताप सरनाईक यांच्या विरोधातील सूर वाढल्याचे चित्र आहे. मुलाखतीसाठी गेलेल्या सरनाईक यांच्यावर आता आरोप केले जात असून राष्ट्रवादी सोडून ते शिवसेनेत जरी डेरेदाखल झाले असले तरी ते आजही एकनिष्ठ नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
परंतु, यामागे वेगळेच राजकारण शिजत असल्याचा आरोप सरनाईकांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
(प्रतिनिधी)