ढोलताशांच्या गजरात शिवाजी महाराजांचा जयघोष

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:02+5:302015-02-20T01:10:02+5:30

- राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे आयोजन : शिवप्रतिष्ठा पथकाचे दमदार सादरीकरण

Shivaji Maharaj's hail | ढोलताशांच्या गजरात शिवाजी महाराजांचा जयघोष

ढोलताशांच्या गजरात शिवाजी महाराजांचा जयघोष

-
ाणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे आयोजन : शिवप्रतिष्ठा पथकाचे दमदार सादरीकरण
नागपूर : शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा मंत्र दिला आणि रयतेचे राज्य निर्माण केले. स्वराज्य मिळाल्यावर रयतेने महाराजांचा विजयी जल्लोष केला आणि या जल्लोषात उत्साहाला उधाण आणणाऱ्या ढोलताशांचा गजर केला. हा नाद विजयाचा आणि समाधानाचा तसेच वीरत्वाच्या हुंकाराचा होता. आज शिवजयंतीनिमित्त शिवप्रतिष्ठा ढोलताशा पथकाने लक्ष्मीनगर येथील प्रांगणात ढोलताशांच्या निनादाने परिसर दुमदुमला. शिवाजी महाराजांचा जयघोष करीत झालेले हे सादरीकरण उपस्थितांमध्येही उत्साहाचा संचार करणार होते.
राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महापौर प्रवीण दटके, संदीप जोशी, पोलीस निरीक्षक माने, सुधीर वऱ्हाडपांडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. शिवाजी महाराजांचे स्मरण करताना यावेळी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी घोड्यावरून बालशिवाजीचा वेश घेतलेला मुलगा आणि जिजाऊची वेशभूषा केलेली एक मुलगी यांची घोड्यावरून परिसरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेक शिवभक्त सहभागी झाले होते. त्यानंतर लक्ष्मीनगरच्या प्रांगणात जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचे जल्लोषात प्रतिकात्मक स्वागत करण्यात आले. याप्रसंगी फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला. शिवाजी महाराजांच्या जयघोषातच ढोलताशा पथकाने वादनाला प्रारंभ करीत विविध तालांचे जोशपूर्ण सादरीकरण केले. यातून साऱ्याच उच्चशिक्षित युवक-युवतींनी आपल्या दमदार वादनातून मराठबाण्याचा परिचय दिला. मंगलसमयी विजयी घोष करण्याची आपली परंपरा शिवाजी महाराजांच्या काळापासूनच चालत आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणपती, तुळजाभवानीच्या नामघोषासह महाराजांचा जयघोष करीत झालेले हे वादन उपस्थितांना स्फूर्ती देणारे आणि उत्साह देणारे होते. पथकातील सर्वच युवक-युवतींनी डोक्यावर भगवे फेटे बांधले होते तर पथकाच्या मधात एक सदस्य सातत्याने भगवा ध्वज उंचावत होता. याशिवाय उपस्थित नागरिकांनीही भगवे फेटे धारण केले होते आणि त्यात शिवकालीन वेशभूषा केलेले बालक मंचावर उपस्थित असल्याने लक्ष्मीनगरात शिवशाहीच अवतरली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न मोहिले आणि उपाध्यक्ष वैभव गंजापुरे, वैभव पुणतांबेकर, आनंद कसगीकर, अमोल अन्वीकर, नीरज दमकुलस आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Shivaji Maharaj's hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.