'गलवान व्हॅलीत चिन्यांनी त्यांचा झेंडा फडकविल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. घरात बाता व सीमेवर लाथा अशी आमची अवस्था चीनच्या बाबतीत दिसत आहे. हे चित्र धक्कादायक आहे. गलवान व्हॅलीत एक वर्षापूर्वी कर्नल संतोष बाबूसहित २० हिंदुस्थानी जवानांना चिन्यांनी ठेचून मारले. तेव्हाही फक्त शब्दांच्याच फैरी झडल्या. आता तर त्याही बंद झाल्या,' असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
'उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत ज्यांचा झेंडा फडकायचा तो फडकेल. सत्ता, दहशत, केंद्रीय तपास यंत्रणांची फौज हाती असल्यावर विजयाचे झेंडे सहज फडकविता येतात, पण गलवानमध्ये लाल चिन्यांचा झेंडा उतरवून तिरंगा कधी फडकविणार, यावर काय ते बोला!,' असेही शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केंद्र सरकारवर टीकेचा बाण सोडलाय.
काय म्हटलेय अग्रलेखात?'पंतप्रधान मोदींसह त्यांचे अर्धे मंत्रिमंडळ नेहमीप्रमाणेच विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दंग झाले आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुका जिंकून भाजपचा झेंडा फडकवायचा यासाठी मोदी व त्यांच्या कॅबिनेटने शर्थ चालवली आहे, पण याच काळात पूर्व लडाखजवळील गलवान व्हॅलीत लाल चिनी घुसले असून नववर्षदिनी चिन्यांनी त्यांचा राष्ट्रध्वज गलवान खोऱ्यात फडकवून हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वास आव्हान दिले आहे.'
'शाब्दीक आक्रमणही नाही''चीन सरकारने हिंदुस्थानच्या हद्दीत फक्त त्यांचा झेंडाच फडकविला असे नाही, तर या ध्वजारोहण सोहळय़ाचे संपूर्ण चित्रीकरण करून तो व्हिडीओ अधिकृतपणे प्रसारित केला आहे. गलवान व्हॅलीत घुसून चिन्यांनी सैनिकी संचलन केले. ध्वज फडकविला, त्यांचे राष्ट्रगीत गायले. व्हॅलीत फलकही लावले की, ‘आम्ही आमची एक इंच भूमीही सोडणार नाही.’ हे सरळ सरळ आव्हान आणि चिथावणीच आहे. पंतप्रधान मोदी किंवा त्यांच्या सरकारातील प्रमुख लोकांनी चिन्यांच्या या घुसखोरीवर साधे शाब्दिक आक्रमणही केले नाही. भाजपच्या आय.टी., सायबर फौजाही या प्रश्नी शरणागतीचे पांढरे निशाण फडकवून बसल्या आहेत. गलवान व्हॅलीत चिनी घुसले व त्यांनी त्यांचा झेंडा फडकविला ही बाब मोदी सरकारला, भारतीय जनता पक्षाला गंभीर वाटू नये?'
'पण चीनवर बोलत नाहीत'5 मे 2020 रोजी याच व्हॅलीत आपल्या सैनिकांची चिन्यांबरोबर रक्तरंजित झटापट झाली होती. त्यात आमचे वीसेक सैनिक शहीद झाले. गलवान व्हॅली हिंदुस्थानी सैनिकांच्या रक्ताने भिजली. त्या सर्व शहीद सैनिकांच्या शौर्याचा सन्मान हिंदुस्थान सरकारने केला, पण वर्षभरातच चिनी सैनिक त्याच प्रदेशात आक्रमण करून घुसले व देशाच्या राजधानीत साधी सळसळही झाली नाही. उत्तर प्रदेशातील एका अत्तर व्यापाऱ्याकडे आयकर विभागाने धाडी घालून शे-दोनशे कोटी रुपये पकडले. त्यावर पंतप्रधान व त्यांचे सहकारी जाहीर सभांतून भाषणे ठोकतात, पण गलवान व्हॅलीत चिन्यांनी झेंडा फडकविला यावर बोलत नाहीत. पंतप्रधान व त्यांचे सहकारी विरोधकांना संपविण्याची व पराभूत करण्याची भाषा जोरकसपणे करतात, पण घुसलेल्या चिन्यांचे ते नाव घेत नाहीत. चिन्यांना धडा शिकवायचे ते बोलत नाहीत.
'पाकिस्ताननला दम भरणे सोपे'चीनची घुसखोरी लडाखच्या गलवान व्हॅलीपुरतीच मर्यादित नाही. अरुणाचल, उत्तराखंड, सिक्कीम प्रांतातही चीन घुसखोरी करीत आहे. अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांची नावे चीनच्या नकाशावर परस्पर बदलून चिन्यांनी आपली कळ काढली आहे, पण पाकडय़ांची कळ जेवढी जोरात लागते तेवढी चिन्यांची लागत नाही. पाकिस्तान हा एक कमजोर, तितकाच विस्कळीत देश आहे. त्यामुळे पाकडय़ांना दम भरणे, डोळे वटारणे, एखादा सर्जिकल स्टाईक करून शौर्य गाजविण्याचा आव आणणे सोपे असते. चीनच्या बाबतीत ते सोपे नाही.
'चीन स्वयंभू महासत्ता'चीन ही एक स्वयंभू महासत्ता आहे. रशिया, अमेरिकेपेक्षा ती चार पावले पुढे आहे. आशिया खंडातील अनेक राष्ट्रे चीनने आर्थिक व लष्करी बळाने गिळली आहेत. त्यामुळे चीनने कितीही घुसखोरी केली तरी लालभाईंच्या बाबतीत हिंदुस्थान संयम आणि सबुरीनेच घेणार आहे. चीनने आपल्या वीस सैनिकांचे बळी घेतले तरी उद्या पुन्हा एकदा चीनचे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादेत येऊन आमच्या पंतप्रधानांबरोबर झोपाळय़ावर झुलताना व फाफडा, ढोकळा खाताना दिसतील; कारण चीन हे एक सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य आर्थिक तसेच लष्करी आहे. चीनचे किमान 20 टक्के आर्थिक सामर्थ्य हिंदुस्थानच्या व्यापारावर अवलंबून आहे, पण चिनी व्यापारावर बंदी घालण्याची हिंमतही आमचे शूरवीर केंद्र सरकार दाखवू शकले नाही.