शिवसेनेला पाच हजार मते
By Admin | Updated: February 11, 2015 02:06 IST2015-02-11T02:06:52+5:302015-02-11T02:06:52+5:30
दिल्लीच्या निकालानंतर भाजपावर तोंडसुख घेणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीत अवघी पाच हजार मते मिळाली.

शिवसेनेला पाच हजार मते
रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
दिल्लीच्या निकालानंतर भाजपावर तोंडसुख घेणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीत अवघी पाच हजार मते मिळाली. तर केंद्रात मंत्रिपदासाठी आस लावून बसलेले खा. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाची चांगलीच दांडी उडाली.
शिवसेनेने २२ उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यापैकी तिघांचे अर्ज बाद ठरले. उर्वरित १९ उमेदवारांना एकत्रितपणे ४ हजार ९०६ मते मिळाली. तर आठवले यांच्या चार उमेदवारांना १४९ मते मिळाली. राजौरी गार्डन नावाच्या व्यापारी व श्रीमंत लोकांच्या वस्तीत शिवसेनेच्या उमेदवाराने चौथ्या क्रमांकाची मते मिळविली. उरलेल्या १८ जागांवर शिवसेनेला नामुश्कीच पत्कारावी लागली. काँग्रेसचे प्रचारप्रमुख अजय माकन यांच्या विरोधात उमेदवाराला उतरवून पहिले दोन दिवस शिवसेनेने चांगली वातावरण निर्मिती केली, मात्र नंतर उमेदवार कोण हेही कुणाच्या ध्यानात नव्हते. त्या उमेदवारास अवघी २५७ मते मिळाली. १९ मधील पाच उमेदवारांना ५०च्या आतील मते मिळाली. पाच जण १००पर्यंत पोहोचले. चार जणांनी दीडशेपर्यंत मते घेतली. नरेला, सुल्तानपूर, मगोलपुरी, बुराडी, पटपडगंज या संमिश्र वस्तीत चारशेच्या आसपास धावा काढल्या.
मराठी माणसांच्या करोलबाग, जनकपुरी वस्तीत शिवसेनेला ५० वर मते मिळालेली नाहीत. शिवसेनेचे दिल्लीप्रमुख ओमदत्त शर्मा यांनी शिवसेनेच्या नेत्यांनी कसे वाऱ्यावर सोडले ते सांगून एकही उमेदवार विजयी होणार नाही किंवा स्पर्धेतही असणार नाही, असे निवडणुकीपूर्वीच सांगून टाकले होते.