वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Amendment Bill) आज (02 अप्रैल) लोकसभेत सादर करण्यात आले असून त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीए पूर्णपणे तयार आहे. या विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेत आज शिवसेना (शिंदे) खासदार श्रीकांत शिंदे यांनीही भाग घेतला होता. यावेळी या विधेयकाच्या बाजूने बोलत त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, "मी माझा पक्ष शिवसेना आणि आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने या विधेयकाचे पूर्णपणे समर्थन करतो. आज एक ऐतिहासिक दिवस आहे. आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, आधी कलम ३७०, नंतर ट्रिपल तलाक सीए आणि आज गरीब मुस्लिम बांधवांच्या उद्धारासाठी हे वक्फ विधेयक सभागृहात आणण्यात आले आहे."
अरविंद सावंतांना टोला -शिंदे म्हणाले "मला अरविंद सावंत यांना पहिला प्रश्न विचारायचा आहे की, त्यांनी आज हिरव्या रंगाचे जॅकेट बुधवारसाठी परिधान केले आहे की, वक्फसाठी खास ड्रेस करून आले आहात? मला येथे त्यांचे भाषण ऐकताना प्रचंड वेदना झाल्या. अत्यंत धक्कादायक होते. मला यूबीटी वाल्यांना प्रश्न विचारायाचा आहे की, त्यांनी त्यांच्या अतरात्म्याला प्रश्न विचारायला हवा की, आज बाळासाहेब असते, तर ते येथे हे भाषण करू शकले असते का?
"आज या सभागृहात एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे, हे यूबीटी वाले कुणाची विचारधारा मानत आहेत आणि विधेयकाला विरोध करत आहेत. यांच्याकडे आपल्या चुका सुधारण्याची, आपला इतिहास सांभाळायची आणि विचारधारा जिवंत ठेवण्याची सुवर्ण संधी होती. मात्र, यूबीटीने आधीच त्यांची विचारधारा पायदळी तुडवली आहे. बाळासाहेबांची विचारधारा स्पष्ट होती, ती म्हणजे, हिंदुत्वाचे रक्षण, देशाची एकता आणि इतर धर्मातील लोकांसाठी आदर," असे शिंदे म्हणाले.
"आज जर बाळासाहेब ठाकरे येथे असते अन्..." -श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, "आज जर बाळासाहेब ठाकरे येथे असते आणि त्यांनी यूबीटीची डिसेंट नोट वाचली असती, तर त्यांच्या आत्म्याला प्रचंड वेदना झाल्या असत्या. मी येथे यूबीटीची असहमती नोट घेऊन आलो आहे, यात त्यांनी म्हटले आहे की, गैर-मुस्लिम सदस्य वक्फ बोर्डमध्ये नसावेत आणि त्यावर ते शिष्टाई करत होते. बाळासाहेब नेहमी हिंदुत्वासाठी लढत होते. मला वाटले यांना केवळ हिंदूत्वाची अॅलर्जी होती, मात्र आज युबाटीला हिंदूंचीही अॅलर्जी होऊ लागली आहे."
हे लोक औरंगजेबाच्या विचारधारेवर चालतायत, असे आम्ही उगाचच म्हणत नाहीत -औरंगजेब आणि अफजलखानाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, "आज त्यांनी आणखी एका असहमती नोटमध्ये म्हटले आहे की, विविध शासक, नवाब आणि जमीनदारांनी समर्पित केलेल्या वैयक्तिक मालमत्तांचे संरक्षण आणि जतन करा." हे लोक औरंगजेब आणि अफजलखानाच्या विचारधारेवर चालत आहेत, असे आम्ही उगाचच म्हणत नाहीत. आता त्यांच्या मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी उघडपणे पत्र लिहिण्याचे कामही यूबीटी वाल्यांनी केले आहे."
ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना हालहाल करून मारले, आज त्याची वकीली करण्याची वेळ काँग्रेस सोबत उभे राहिल्यानंतर यूबीटी वाल्यांवर आली आहे, असेही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.