अदनान सामीला भारतीय नागरीकत्व देण्यावर शिवसेनेची टीका
By Admin | Updated: January 1, 2016 14:29 IST2016-01-01T14:29:03+5:302016-01-01T14:29:03+5:30
पाकिस्तानी गायक अदनान सामीला भारतीय नागरीकत्व बहाल करण्याच्या निर्णयावर शिवसेनेने टीका केली आहे.

अदनान सामीला भारतीय नागरीकत्व देण्यावर शिवसेनेची टीका
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - पाकिस्तान बाबत नरमाईची भूमिका घेतली म्हणून सातत्याने केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य करणा-या शिवसेनेने पाकिस्तानी गायक अदनान सामीला भारतीय नागरीकत्व बहाल करण्याच्या निर्णयावरही टीका केली आहे.
भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षामध्ये असताना त्यांनी अदनान सामी विरोधात आंदोलन केले होते. आता तेच त्याला नागरीकत्व बहाल करत आहेत अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केली.
केंद्रीय गृहमंत्रालयाने काल ३१ डिसेंबरला अदनान सामीला भारतीय नागरीकत्व बहाल करण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती. त्यानुसार आज शुक्रवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्रालयात पत्नीसह आलेल्या अदनानला केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी भारतीय नागरीकत्वाची कागदपत्रे बहाल केली.
अदनाने भारत सरकारचे आभार मानले आहेत. आजचा दिवस माझ्यासाठी प्रचंड आनंदाचा असल्याचे त्याने सांगितले. पाकिस्तानी कलाकारांचे भारतात कार्यक्रम आयोजित करण्यावर त्यांना आश्रय देण्याला शिवसेनेचा सक्त विरोध आहे.