शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे आदर्श - हार्दिक पटेल
By Admin | Updated: August 28, 2015 14:37 IST2015-08-28T14:34:10+5:302015-08-28T14:37:37+5:30
सरदार वल्लभभाई पटेल व दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले आदर्श असल्याचे गुजरातमधील पाटीदार पटेल समाजाचा आंदोलनाचा प्रणेता हार्दिक पटेल याने म्हटले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे आदर्श - हार्दिक पटेल
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २८ - सरदार वल्लभभाई पटेल यांच्याप्रमाणेच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेही आपले आदर्श आहेत, असे गुजरातमधील पाटीदार पटेल समाजाचा आंदोलनाचा प्रणेता हार्दिक पटेल याने म्हटले आहे. मला बाळासाहेंबाप्रमाणे रिमोट कंट्रोल चालवायचा असल्याचे त्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. राजकीय पक्ष काढणार का असा प्रश्न विचारला असता त्याने स्पष्ट नकार दिला. राज्यातील १८२ मतदारसंघाचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात असताना मला नवा राजकीय पक्ष काढण्याची किंवा एखाद्या पक्षात जाण्याची गरजच काय, असा सवालही त्याने विचारला.
आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून पटेल समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण गुजरात ढवळून निघाला आहे. या आंदोलनाचा प्रणेता असलेल्या हार्दिकला मंगळवारी अटक करण्यात आल्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात तणावपूर्ण शांतता आहे, त्याबद्दल हार्दिक सांगतो, आम्ही त्या दिवशी (मंगळवार) उपोषणाला बसलो होतो, मात्र अचानक पोलिस तेथे आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरूवात केली. ज्याप्रमाणे जालियनवाला बागमध्ये जनरल डायरने अंदाधुंद गोळीबार केला होता, तसाच लाठीमार पोलिसांनी आमच्यावर केला. पोलिसांमध्ये जनरल डायर कोण होता, ते आत्ता माहित नाही, पण ज्यादिवशी ते समजेल, तेव्हा त्यालाही जनरल डायरप्रमाणेच मारण्यात येईल, असा धमकीवजा इशाराही हार्दिकने यावेळी दिला.
'पाटीदार अनामत आंदोलन समिती'च्या स्थापनेआधी मी मी २०१२ ते २०१४ पर्यंत सरदार पटेल ग्रुपचा अध्यक्ष होता. तेव्हा १७ जिल्ह्यांमधील ४० हजार तरूण आमच्यासोबत होते. आमच्या समाजाचे, शेतक-यांचे तसेच समाजातील माता- भगिनींचे रक्षण करणे हा आमच्या संघटनेचा प्रमुख उद्देश असल्याचा तो म्हणाला.