दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी जनसुनावणी सुरू असताना हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सिव्हिल लाइन्स येथील त्यांच्या सरकारी बंगल्यावर ही घटना घडली. एका व्यक्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला, त्यानंतर तिथे एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर काही प्रत्यक्षदर्शींनी आणि राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमका काय घडला प्रकार?प्रत्यक्षदर्शी सुरेश खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही सकाळी ८ च्या सुमारास तिथे पोहोचलो होतो. थोड्याच वेळात मुख्यमंत्री जनसुनावणीसाठी आल्या. त्यांनी लोकांशी बोलायला सुरुवात केली, त्याचवेळी एक व्यक्ती अचानक पुढे आला आणि त्याने हल्ला केला. हा हल्ला साधारण ८ वाजून ५ ते १० मिनिटांच्या दरम्यान झाला." पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला अनुभवशैलेंद्र कुमार नावाचे एक नागरिक उत्तम नगर येथून गटारांच्या समस्येबाबत तक्रार करण्यासाठी आले होते. त्यांनी सांगितलं की, "आम्ही इथे आलो आणि अचानक एकच धावपळ सुरू झाली. 'मुख्यमंत्र्यांवर हल्ला झाला' असं लोक बोलू लागले." ते म्हणाले की, जनसुनावणी सुरू असतानाच ही घटना घडली.
अंजली नावाच्या आणखी एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "जनसुनावणीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे. अशा प्रकारे कुणी येऊन मुख्यमंत्र्यांवर हल्ला करतो, हे खूप चुकीचं आहे." आरोपी त्याची काहीतरी समस्या सांगत होता आणि त्याचवेळी त्याने मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला, असं तिने सांगितलं. पोलिसांनी लगेचच त्याला ताब्यात घेतल्याचंही तिने नमूद केलं.
भाजप अध्यक्षांनी दिले स्पष्टीकरणया घटनेनंतर दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की, एका तरुणाने मुख्यमंत्र्यांना एक कागद दिला आणि त्याचवेळी त्यांना पुढे ओढले. यामुळे रेखा गुप्ता यांचे डोकं टेबलावर आदळले. त्या सध्या धक्क्यात आहेत, पण त्यांची वैद्यकीय तपासणी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सचदेवा यांनी पुढे स्पष्ट केलं की, "मुख्यमंत्र्यांवर दगडफेक झाली किंवा त्यांना चापट मारण्यात आली अशा ज्या बातम्या येत आहेत, त्या पूर्णपणे निराधार आहेत."
आरोपीची ओळख पटलीपोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपीचं नाव राजेश भाई खिमजी भाई सकरिया (वय ४१) असल्याचं समोर आलं आहे. तो गुजरातच्या राजकोट येथील रहिवासी आहे. सध्या पोलीस त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी करत आहेत.
राजकीय प्रतिक्रियाया घटनेची काँग्रेस आणि 'आप' नेत्यांनी निंदा केली आहे. दिल्ली काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. तसेच, "जर मुख्यमंत्रीच सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेचं काय होईल?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनीही या हल्ल्याची निंदा केली. "लोकशाहीत असहमती आणि विरोधाला जागा आहे, पण हिंसेला नाही," असं त्या म्हणाल्या. तसेच, दिल्ली पोलीस आरोपींवर कठोर कारवाई करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.