पत्नीवर बलात्कार करुन तिला लुटणा-या पतीला अटक
By Admin | Updated: August 11, 2016 14:14 IST2016-08-11T14:14:12+5:302016-08-11T14:14:12+5:30
पत्नीवर बलात्कार करुन तिची सोन्याची चैन चोरल्या प्रकरणी नोएडा पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

पत्नीवर बलात्कार करुन तिला लुटणा-या पतीला अटक
ऑनलाइन लोकमत
नोएडा, दि. ११ - पत्नीवर बलात्कार करुन तिची सोन्याची चैन चोरल्या प्रकरणी नोएडा पोलिसांनी पतीला अटक केली आहे. हे जोडपे नोएडा सेक्टर १२० मध्ये हायराईज सोसायटीमध्ये रहाते. आरोपी पती नोएडामध्ये खासगी कंपनीत नोकरीला आहे. पीडित महिलेने रविवारी पोलिसात पती विरोधात बलात्कार आणि चोरीची तक्रार दाखल केली.
आरोपी पती पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. पीडित महिला बिहारची रहाणारी असून कामाच्या शोधात ती नोएडाला आली होती. २०१३ मध्ये तिची आरोपीबरोबर ओळख झाली व दोघे प्रेमात पडले. सेक्टर १२० मध्ये त्यांनी घर भाडयावर घेतले. २०१३ पासून ते २०१५ पर्यंत ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते.
त्यानंतर स्थानिक न्यायालयात विवाह केल्याचे महिलेने सांगितले. लग्नानंतर काही महिन्यांनी त्यांच्यात छोटया मोठया कारणावरुन वादविवाद सुरु झाले. मागच्या आठवडयात पतीने आपल्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने आपल्याबरोबर शरीरसंबंध ठेवले व सोन्याची चैन घेऊन पसार झाला असा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे.